(मुंबई)
पुणे ते मुंबई प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ करण्यासाठी प्रस्तावित नवीन आठ पदरी द्रुतगती महामार्गाच्या सविस्तर प्रकल्प अहवालाला (डीपीआर) राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) अंतिम रूप दिले आहे. केंद्र व राज्य सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर आता केवळ पर्यावरण आणि स्थानिक प्रशासनाच्या काही परवानग्या प्रलंबित असून, त्या पूर्ण होताच या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम सुरू होणार आहे.
या नव्या पुणे–मुंबई द्रुतगती महामार्गामुळे दोन्ही शहरांमधील प्रवासाचा कालावधी अवघ्या 90 मिनिटांवर येईल, असा दावा एनएचएआयकडून करण्यात आला आहे. सध्या असलेल्या द्रुतगती महामार्गावरील वाढती वाहतूक, अपघात आणि सततची कोंडी लक्षात घेता हा प्रकल्प प्रवाशांसाठी मोठा दिलासा देणारा ठरणार आहे.
पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) प्रस्तावित केलेल्या वर्तुळाकार रस्त्याशी हा महामार्ग जोडला जाणार आहे. पुणे–नाशिक, मुंबई–बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग तसेच इतर राज्य महामार्गांची वाहतूक या वर्तुळाकार रस्त्यावर वळवली जाणार असल्याने शहरातील ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यापूर्वीच पुणे–मुंबई द्रुतगती महामार्गाला समांतर दुसऱ्या उच्च क्षमतेच्या महामार्गाची घोषणा केली होती. भोर येथील वर्तुळाकार रस्त्यापासून सुरू होणाऱ्या या प्रस्तावित प्रकल्पासाठी सुमारे 15 हजार कोटी रुपयांचा डीपीआर तयार करण्यात आला असल्याची माहिती एनएचएआयने दिली.
एनएचएआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, सध्याच्या पुणे–मुंबई द्रुतगती महामार्गावर दररोज अडीच ते तीन लाख वाहनांची वाहतूक होते. वळणावळणाचा रस्ता, अवजड वाहनांची मोठी संख्या आणि वाढती वाहतूक यामुळे अपघात व कोंडीचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षित, वेगवान आणि अधिक क्षमतेचा पर्यायी महामार्ग उभारण्यात येणार असून, सामान्य परिस्थितीत प्रवाशांना दीड तासात पुणे–मुंबई प्रवास पूर्ण करता येईल.
या प्रकल्पासाठी तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यात आली असून पर्यावरण आणि संबंधित संस्थांच्या परवानग्या अंतिम टप्प्यात आहेत. निविदा प्रक्रिया लवकरच राबवून तीन वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचेही कदम यांनी स्पष्ट केले.
अतिरिक्त फायदा
नवीन पुणे–मुंबई द्रुतगती महामार्गामुळे औद्योगिक, आर्थिक आणि आयटी क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. सततच्या वाहतूक कोंडीत अडकणाऱ्या वाहनचालक आणि प्रवाशांचा वेळ वाचणार असून व्यापार, लॉजिस्टिक्स आणि उद्योगांसाठी हा महामार्ग अत्यंत फायदेशीर ठरणार असल्याचा अंदाज एनएचएआयच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

