(रायगड / वृत्तसंस्था)
ताम्हिणी घाटातील दरीत आढळलेल्या अनोळखी महिलेच्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. तांत्रिक तपास आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या २४ तासांत महिलेची ओळख पटवली असून, तिच्या हत्येप्रकरणी दोन संशयितांना पिंपरी-चिंचवड परिसरातून ताब्यात घेतले आहे. फिरण्याच्या बहाण्याने महिलेला ताम्हिणी घाटात नेऊन तिची हत्या केल्यानंतर मृतदेह दरीत फेकल्याची माहिती चौकशीत समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
ताम्हिणी घाटातील दरीत महिलेचा मृतदेह
२५ ऑगस्ट रोजी दुपारी माणगाव पोलिसांना ताम्हिणी घाट परिसरातील मौजे कोंढेधर गावाच्या हद्दीत पुणे-माणगाव रस्त्यालगत असलेल्या दरीत २५ ते ३० वर्षे वयोगटातील एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला. मृतदेह बेवारस अवस्थेत असल्याने परिसरात खळबळ उडाली होती.
महिलेचा गळा आवळून हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला. सुरुवातीला या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली. मात्र, तपास आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे हा मृत्यू नसून हत्या असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर २६ ऑगस्ट रोजी माणगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) आणि २३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
२४ तासांत महिलेची ओळख पटवली
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल आणि अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथके तयार करण्यात आली. या पथकांनी तांत्रिक तपासासह उपलब्ध माहितीच्या आधारे मृत महिलेची ओळख पटवण्याचे काम सुरू केले. तपासादरम्यान मृत महिला ही सुमन गोपाळ यादव, रा. चिखली, पुणे, मूळ रा. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश येथील असल्याचे निष्पन्न झाले.
पुण्यातून दोन संशयित ताब्यात
महिलेची ओळख पटवल्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली. मिळालेल्या माहितीच्या आधारे दुर्गाप्रसाद मंगलप्रसाद प्रजापती (२४) आणि दिनेशकुमार बिसराम प्रजापती (२७), दोघेही चिखली, पुणे येथील रहिवासी, यांच्यावर पोलिसांना संशय आला. पोलिसांनी संशयितांच्या ठावठिकाणाची माहिती मिळवत त्यांना पिंपरी-चिंचवड परिसरातून तपासासाठी ताब्यात घेतले.
फिरण्याच्या बहाण्याने घाटात नेल्याचा आरोप
पोलिसांच्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान दोन्ही संशयितांनी महिलेला फिरण्याच्या बहाण्याने ताम्हिणी घाटात नेल्याची माहिती दिली. त्यानंतर ओढणीच्या साहाय्याने तिचा गळा आवळून हत्या केली आणि मृतदेह ताम्हिणी घाटातील दरीत फेकून दिल्याचे त्यांनी सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या घटनेमागील नेमके कारण काय होते, हत्येपूर्वी आणि हत्येनंतर नेमके काय घडले, याचा तपास आता माणगाव पोलीस करत आहेत.
दोन्ही संशयितांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी माणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणातील पुरावे, हत्येचे कारण आणि अन्य संभाव्य बाबींचा तपास सुरू असून, पुढील तपासातून आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

