(रत्नागिरी / वार्ताहर)
महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाचे अपर निबंधक तथा सहसचिव संतोष पाटील यांनी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सदिच्छा भेट देऊन बँकेच्या कामकाजाचा आणि आर्थिक प्रगतीचा आढावा घेतला. रत्नागिरी जिल्हा बँक ही राज्यातील अग्रगण्य जिल्हा बँक असून नाबार्ड तसेच शासनाने निश्चित केलेल्या विविध निकषांमध्ये बँकेची कामगिरी उल्लेखनीय असल्याचे सांगत त्यांनी बँकेच्या प्रगतीचे कौतुक केले.
यावेळी संतोष पाटील यांनी कोकण विभागातील शेती कर्जवाटपातील अडचणी तसेच सहकारी बँकांना भविष्यात अधिक सक्षमपणे प्रगती करण्यासाठी आवश्यक असलेल्या धोरणात्मक बदलांबाबत चर्चा केली. बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजी चोरगे यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना भेडसावणाऱ्या विविध मर्यादा आणि धोरणात्मक अडचणी मांडल्या. बँकेचे एक्स्पोजर लिमिट, कोकणातील सामाईक ७/१२ उताऱ्यांमुळे कर्ज वितरणावर होणारा परिणाम तसेच कोकणातील युवकांचे वाढते स्थलांतर या प्रश्नांवर शासनस्तरावर आवश्यक धोरणात्मक बदल करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बँकेच्या आर्थिक स्थितीचा सविस्तर आढावा संतोष पाटील यांच्यासमोर सादर केला. या वेळी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, रत्नागिरी तसेच बँकेचे संचालक आणि अधिकारी उपस्थित होते.
यानंतर संतोष पाटील यांनी राजापूर तालुक्यातील शासनाचा ‘सहकार भूषण’ पुरस्कार प्राप्त नाटे विविध कार्यकारी सहकारी संस्थेला भेट देऊन संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, रत्नागिरी राम कुलकर्णी, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अमजद बोरकर, सरव्यवस्थापक संदीप तांबेकर, राजापूरचे सहाय्यक निबंधक, संस्थेचे अध्यक्ष विलास फणसेकर, व्यवस्थापन समितीचे सदस्य, सचिव तसेच सभासद उपस्थित होते.
या भेटीदरम्यान ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६’ अंतर्गत पात्र लाभार्थ्यांपैकी प्रातिनिधिक स्वरूपात दोन लाभार्थ्यांना बेबाकी प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच नवीन कर्ज वाटपाचा धनादेशही लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला. संस्थेने नव्याने सुरू केलेल्या बचत योजनेतील पाच खातेदारांना संतोष पाटील यांच्या हस्ते पासबुकचे वाटप करण्यात आले. याशिवाय संस्थेच्या सभासदांना वृक्षारोपणाच्या संकल्पनेतून सुपारीच्या रोपांचे वितरण करण्यात आले.
यावेळी संस्था कमिटी सदस्य, सभासद आणि सचिव यांच्याशी संवाद साधताना संतोष पाटील यांनी शेतकऱ्यांना कर्जवाटप करताना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. केवळ कर्ज व्यवहारापुरते मर्यादित न राहता संस्थेने नव्या व्यवसायांच्या संधी निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशा सूचना त्यांनी केल्या. संस्थेच्या विविध उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.
त्यानंतर संतोष पाटील यांनी संस्थेच्या धान्य विभाग, एस.टी. आरक्षण केंद्र, कीटकनाशके विभाग, शेती अवजारे विभाग, प्लास्टिक विभाग, ग्राहक भांडार आणि सीएससी सेंटरला भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली. संस्थेच्या विविधांगी उपक्रमांबाबत समाधान व्यक्त करत त्यांनी संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

