(मुंबई)
गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठी आणि हिंदी भाषेच्या वापराबाबत सामाजिक आणि राजकीय वादाला तोंड फुटले असून, विशेषतः मीरा रोड परिसरात याचे तीव्र पडसाद उमटले. या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि भारतीय जनता पक्षाने (भाजप) मराठी भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी सकारात्मक आणि विधायक उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे.
मनसेचा ‘मराठीची पाठशाळा’ उपक्रम
मनसेकडून बोरिवली पश्चिम भागात अमराठी व्यापाऱ्यांसाठी ‘मराठीची पाठशाळा’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यामध्ये अनेक अमराठी व्यावसायिकांनी सहभाग घेत, मनसे कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी बाराखडी, मूलभूत शब्दसंग्रह आणि दैनंदिन व्यवहारातील मराठी वाक्यरचना शिकण्यास सुरुवात केली आहे. या उपक्रमामागील उद्दिष्ट म्हणजे स्थानिक नागरिकांशी संवाद अधिक सुलभ होण्यासाठी अमराठी व्यापाऱ्यांना मराठी भाषा शिकवणे. एका सहभागी व्यापाऱ्याने सांगितलं, “इथं व्यवसाय करताना स्थानिक भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे. ही संधी मिळाल्यामुळे आम्हाला खूप समाधान वाटतं.”
मनसे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं की, “मराठी ही फक्त भाषा नाही, तर इथल्या संस्कृतीची ओळख आहे. आम्ही कोणावरही दबाव टाकत नाही, पण स्थानिक भाषेचा सन्मान राखण्याचा आग्रह कायम ठेवणार.”
भाजपकडूनही मोफत मराठी वर्गांची घोषणा
मराठी विरुद्ध हिंदी या वादाच्या पार्श्वभूमीवर भाजपनेही मोठा निर्णय घेत अमराठी नागरिकांसाठी मोफत मराठी शिकवणी वर्ग सुरू करण्याची घोषणा केली आहे. या वर्गांची माहिती देताना भाजप प्रवक्ते आणि हिंदी साहित्य भारती महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रा. डॉ. दयानंद तिवारी यांनी सांगितले की, “हे वर्ग दर रविवारी सांताक्रूझ आणि सायन येथे घेतले जाणार असून, कोणीही मोफत नोंदणी करून सहभागी होऊ शकतो.”
या वर्गांमध्ये मराठीचे स्वर, व्यंजने, योग्य उच्चार, तसेच दैनंदिन संवाद कौशल्ये शिकवली जाणार आहेत. विशेष म्हणजे, यामध्ये चांगली प्रगती करणाऱ्यांना ज्ञानेश्वरीचा हिंदी अनुवाद गिफ्ट म्हणून देण्यात येणार आहे. या वर्गांसाठी 35 ते 60 वयोगटातील ड्रायव्हर, भाजी विक्रेते, सुरक्षा रक्षक आणि अन्य व्यावसायिकांना प्राधान्य दिले जाणार आहे.