(पुणे / वृत्तसंस्था)
श्रावण महिन्यात मांसाहारासाठी हट्ट केल्याच्या कारणावरून पुण्यातील वारजे माळवाडी परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. दारूच्या नशेत घरी आलेल्या 30 वर्षीय मुलाने मांसाहारी जेवणाची मागणी केल्यानंतर त्याचा आई-वडिलांसोबत वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर वडिलांनी मुलाच्या तोंडावर आणि डोक्यावर केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी वारजे पोलिसांनी मृत तरुणाच्या आई-वडिलांना अटक केली आहे.
महेश भागवत गायकवाड (वय 30) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याच्या मृत्यूप्रकरणी त्याच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून वडील भागवत सूर्यभान गायकवाड (वय 64) आणि आई पार्वती भागवत गायकवाड (वय 60) यांच्याविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 24 ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा ते पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान वारजे माळवाडी येथील रामनगर परिसरात घडली. महेश याचा सुमारे दहा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. मात्र, तो कोणतेही काम करत नसल्याचे तसेच त्याला दारूचे व्यसन असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. दारूच्या व्यसनामुळे पत्नीशी त्याचे वारंवार वाद होत होते. या वादातून त्याच्या पत्नीने त्याला घटस्फोट दिला होता.
घटस्फोटानंतर महेश हा आई-वडिलांकडे जेवण्यासाठी येत होता. मात्र, त्याच्या दारूच्या व्यसनामुळे घरातही वारंवार वाद होत असल्याचे पोलिसांनी सांगितले. सध्या श्रावण महिना सुरू असल्याने घरात मांसाहार केला जात नव्हता. त्यामुळे मांसाहार करण्यावरून महेश आणि त्याच्या आई-वडिलांमध्ये यापूर्वीही वाद झाल्याचे समोर आले आहे.
24 ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास महेश दारूच्या नशेत घरी आला. त्याने मांसाहारी जेवणाची मागणी केली. मात्र, श्रावण महिना असल्याने घरी मांसाहार केला जात नसल्याचे आई-वडिलांनी त्याला सांगितले. त्यानंतरही महेशने मांसाहारासाठी हट्ट धरल्याने त्यांच्यात वाद सुरू झाला.
वाद वाढल्यानंतर वडील भागवत गायकवाड यांनी महेशच्या तोंडावर आणि डोक्यावर मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत महेश गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतरही कुटुंबीयांनी याबाबत तातडीने कोणाला माहिती दिली नसल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, मुलाचा मारहाणीत मृत्यू झाल्याची माहिती असतानाही आई पार्वती गायकवाड हिने पतीला वाचवण्यासाठी घटना लपवण्याचा प्रयत्न केल्याचा पोलिसांचा आरोप आहे. तसेच घटनास्थळावरील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचेही तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी केलेल्या तपासात या घटनेची माहिती समोर आल्यानंतर भागवत गायकवाड आणि पार्वती गायकवाड या दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वारजे पोलीस करत आहेत.

