(पिंपरी-चिंचवड / पुणे)
वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर हुंडाबळीच्या आणखी एका धक्कादायक घटनेने पिंपरी-चिंचवड शहर हादरले आहे. वाकड परिसरात शिल्पा गवारे (वय ४२) यांच्या मृत्यूच्या प्रकरणात त्यांच्या माहेरच्या कुटुंबीयांनी हुंड्यासाठी छळ आणि हत्येचा गंभीर आरोप केला आहे. तब्बल 17 वर्षांचा संसार केल्यानंतर शिल्पा यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या दोन मुलांच्या भवितव्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
शिल्पा गवारे यांचा विवाह सचिन गवारे यांच्याशी झाला होता. लग्नानंतर हुंडा आणि पैशांच्या मागणीवरून शिल्पा यांचा छळ केला जात असल्याचा आरोप त्यांच्या माहेरच्या कुटुंबीयांनी केला आहे. पती सचिन गवारे, सासरे उत्तम गवारे, सासू संजीवनी गवारे आणि दीर संदीप गवारे या चौघांकडून शिल्पा यांचा दीर्घकाळ छळ करण्यात आल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. च्या कुटुंबीयांनी सासरच्या मंडळींवर मानसिक, शारीरिक छळ, पैशांची मागणी तसेच वडिलोपार्जित संपत्तीमध्ये हिस्सा मिळवून देण्यासाठी दबाव टाकल्याचा गंभीर आरोप केला आहे.
शिल्पाचा संसार टिकावा आणि ती सुखी राहावी, यासाठी माहेरच्या कुटुंबीयांनी वेळोवेळी गवारे कुटुंबीयांच्या मागण्या पूर्ण केल्याचा आरोप आहे. यामध्ये दोन एकर जमीन देणे, व्यवसायासाठी मदत करणे तसेच वेळोवेळी लाखो रुपयांची रोकड देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, एवढे करूनही शिल्पाचा कथित छळ थांबला नाही, असा आरोप त्यांच्या माहेरच्या कुटुंबीयांनी केला आहे. पती सचिन याला दारूचे व्यसन असल्याने ते दारू पिऊन शिल्पा यांना मारहाण करत असल्याचा आरोप आहे.
दरम्यान, सचिन गवारे याच्यावर लग्नापूर्वीच हत्येचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे. ही बाब लपवून लग्न लावण्यात आल्याचा आरोपही शिल्पाच्या कुटुंबीयांनी केला आहे. लग्नानंतर पैशांची मागणी वाढत गेली आणि त्यातून शिल्पाचा छळ झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
शिल्पाचा कथित छळ असह्य झाल्यानंतर तिच्या आई-वडिलांनी आणि भावांनी तिला माहेरी येण्याची विनंती केली होती. मात्र, कुटुंब आणि मुलांचा विचार करून शिल्पा सासरीच राहिली. तब्बल 17 वर्षे तिने संसार टिकवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अखेर तिचा मृत्यू झाला.
२७ ऑगस्ट रोजी पहाटे सुमारे एकच्या सुमारास संतोष कलाटे यांचे बंधू रंजीत यांना संदीप गवारे यांनी फोन करून शिल्पा आणि सचिन यांच्यात भांडण झाल्याची माहिती दिली. त्यानंतर कलाटे कुटुंबीय तातडीने काळेवाडी फाटा येथील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये पोहोचले. त्यावेळी शिल्पा बेशुद्ध अवस्थेत असल्याचे कुटुंबीयांना दिसून आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर शिल्पा यांना मृत घोषित केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तक्रारीनुसार, शिल्पा यांनी बेडरूममधील सिलिंग फॅनला साडीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे डॉक्टरांना सांगण्यात आले होते. मात्र, शिल्पाच्या मृत्यूबाबत त्यांच्या माहेरच्या कुटुंबीयांनी गंभीर संशय व्यक्त केला आहे. शिल्पावर सातत्याने मानसिक आणि शारीरिक अत्याचार होत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला असून, त्यामुळे तिचा मृत्यू आत्महत्या नसून संशयास्पद परिस्थितीत झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. या सर्व बाबींचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
शिल्पाने आत्महत्या केल्याचे प्राथमिक स्वरूप समोर आले असले तरी तिच्या माहेरच्या कुटुंबीयांनी हा आत्महत्येचा प्रकार नसून हत्या असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. पोलिसांच्या प्रथमदर्शनी पंचनाम्यात शिल्पाने आत्महत्या केल्यावेळी तिच्या बेडरूमचे दार उघडे असल्याची माहिती समोर आल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना मध्यरात्री सुमारे दीडच्या सुमारास घडली. त्यावेळी पती सचिन घरात असताना तो बेडरूममध्ये का नव्हता, असा सवाल शिल्पाच्या कुटुंबीयांनी उपस्थित केला आहे.
शिल्पाच्या मृत्यूनंतर त्यांच्या माहेरच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून वाकड पोलीस ठाण्यात हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पती सचिन गवारे, सासरे उत्तम गवारे, सासू संजीवनी गवारे आणि दीर संदीप गवारे यांना पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने चौघांनाही 31 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास आत्महत्या आणि हत्या या दोन्ही शक्यता लक्षात घेऊन सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. शिल्पा यांच्या मृत्यूची नेमकी परिस्थिती काय होती, त्यांच्यावर हुंड्यासाठी दबाव टाकण्यात आला होता का, मृत्यूच्या वेळी घरात नेमके काय घडले आणि त्यांच्या मृत्यूमागे अन्य काही कारण होते का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
एका आईच्या मृत्यूमुळे तिच्या दोन मुलांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 17 वर्षांचा संसार अशा दुर्दैवी वळणावर येऊन थांबल्याने शिल्पाच्या माहेरच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शिल्पाच्या मृत्यूचे नेमके कारण आणि या प्रकरणामागील सत्य तपासातून समोर येणार आहे.

