( मुंबई )
जगातील मोठे उद्योगपती आणि टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांचे निधन झाले आहे. भारताच्या उद्योगजगताचा तारा आज निखळला. रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक होती त्यामुळे त्यांना मुंबईतील रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. डॉ.शारुख अस्पी गोलवाला यांच्या नेतृत्वाखालील तज्ञांचे पथक रतन टाटा यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते. मात्र अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे जाणे भारतीय उद्योगजगतालाच नव्हे तर सर्व भारतीयांसाठी दुख:दायक आहे.
सोमवार दि. 7 ऑक्टोबर रोजी रतन टाटा यांची अचानक बिघडल्याची बातमी समोर येत होती. मात्र त्यांनी स्वतः आयसीयूमध्ये दाखल केल्याच्या दाव्याला अफवा असल्याचे म्हटले होते.आयसीयूमध्ये दाखल केल्याच्या दाव्याचे खंडन करताना रतन टाटा स्वतः म्हणाले होते की, ‘माझ्या प्रकृतीबद्दल अलीकडे पसरलेल्या अफवांची मला माहिती मिळाली. मी सर्वांना खात्री देऊ इच्छितो की हे दावे निराधार आहेत. माझे वय आणि तब्येत यामुळे मी सध्या आवश्यक वैद्यकीय तपासणी करत आहे. काळजी करण्यासारखे काही नाही. मला बरे वाटत आहे. मी तुम्हाला विनंती करतो की जनता आणि माध्यमांनी चुकीची माहिती पसरवणे टाळावे, अशी माहिती रतन टाटा यांनी सोशल मीडियावरुन दिली होती.
रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी झाला होता. त्यांचं नाव भारताच्या उद्योग क्षेत्रात अभिमानाने घेतलं जातं. रतन टाटा यांनी फक्त उद्योग क्षेत्रात नाव कमवलं नाही तर त्यांनी माणसं जपली. कोरोना काळात देशावर मोठं संकट कोसळलं होतं. त्यावेळी रतन टाटा यांनी आपल्या हॉटेल्स राज्य सरकारला रुग्णांना क्वारंटाईन करण्यासाठी मोफत दिलं होतं. त्यांच्या या मदतीमुळे राज्यातील कोट्यवधी नागरिकांना मोठी मदत झाली होती. रतन टाटा यांच्याकडे एक खरे देशभक्त म्हणून पाहिलं जायचं. त्यांच्याकडून प्रचंड सामाजिक कार्यदेखील झालं. याशिवाय त्यांनी टाटा ग्रुपच्या विविध कंपन्यांना यशाच्या सर्वोच्च शिखरावरही पोहोचवलं. त्यामुळे रतन टाटा यांचं नाव उद्योग क्षेत्रासोबतच सर्वसामान्यांमध्येदेखील आदराने घेतलं जातं. अशा या दिग्गज उद्योगपतीचं निधन झाल्याने देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
टाटा उद्योगसमुहाचे माजी प्रमुख रतन नवल टाटा हे भारतातीलच नव्हे तर जगभरात भारताच्या उद्योगजगताचे चेहरे होते. त्यांच्या दातृत्वासाठी ते कायम ओळखले जात. त्यांना भारत सरकारने पद्मविभूषण (2008) आणि पद्मभूषण (2000) दोन सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरविले होते. ते प्रतिष्ठित कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूल, बिशप कॉटन स्कूल (शिमला), कॉर्नेल विद्यापीठ आणि हार्वर्डचे माजी विद्यार्थी होते. टाटा यांना 2014 मध्ये ऑनररी नाइट ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायरने गौरविण्यात आलं होतं. त्यांना 2021 मध्ये आसाम वैभव पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. रतन टाटा यांना 2023 मध्ये ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया या पुरस्कराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. अशा अनेक पुरस्कारांनी रतन टाटा यांना देशात आणि विदेशात सन्मानित करण्यात आलं होतं. टाटा यांनी केलेल्या विविध सामाजिक कार्य आणि उद्योग क्षेत्रातील कार्यामुळे त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं.
रतन टाटा एक माणूस म्हणून श्रेष्ठ व्यक्तीमत्व होते. त्यांनी आपल्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा विचार केला. ते आपल्या कंपन्यांमधील कनिष्ठ पातळीवरील कर्मचाऱ्यांच्या थेट संपर्कात जाण्याचा प्रयत्न करायचे. त्यांनी अनेकदा कर्मचाऱ्यांशी तसा संवादही साधला. ते कर्मचाऱ्यांच्या हितासाठी प्रचंड काम करायचे. त्यांच्या प्रेमामुळे कर्मचारीदेखील टाटा यांच्यावर तितकाच प्रेम करायचा.
रतन टाटा यांच्याविषयी…
टाटा यांनी मार्च 1991 मध्ये टाटा सन्सचे अध्यक्षपद स्वीकारले आणि 28 डिसेंबर 2012 रोजी निवृत्त झाले. त्यांच्या कार्यकाळात टाटा समूहाचा महसूल अनेक पटींनी वाढला. हा महसूल 1991 मध्ये फक्त 10,000 कोटी रुपयांच्या उलाढालीवरून 2011-12 मध्ये US$100.09 अब्ज इतका वाढला.
2000 मध्ये टाटा टी कडून US$450 दशलक्ष मध्ये टेटली, 2007 मध्ये £6.2 बिलियन मध्ये टाटा स्टील कडून पोलाद निर्माता कोरस आणि 2008 मध्ये £2.3 बिलियन मध्ये टाटा मोटर्स यासह काही महत्त्वपूर्ण संपादनांद्वारे त्यांनी समूहाचे नेतृत्व केले. यूएस डॉलर्समध्ये ऐतिहासिक जग्वार लँडचा समावेश आहे.
निवृत्तीनंतर टाटा यांना त्यांचे उत्तराधिकारी सायरस मिस्त्री यांच्याशी बोर्डरूम युद्धाचा सामना करावा लागला. ज्यांना 24 ऑक्टोबर 2016 रोजी टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून काढून टाकण्यात आले. मिस्त्री यांना हटवल्यानंतर ते समूहाचे अंतरिम अध्यक्ष म्हणून परत आले आणि जानेवारी 2017 मध्ये समूहाचे नेतृत्व एन. चंद्रशेखरन आणि टाटा सन्सच्या मानद अध्यक्षपदाची भूमिका स्वीकारली.