(रत्नागिरी / वार्ताहर)
तरुणाईच्या कल्पकतेला, अभिनयकौशल्याला आणि सर्जनशीलतेला प्रभावी व्यासपीठ मिळवून देणाऱ्या पुरुषोत्तम करंडक २०२६ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या (स्वायत्त) ‘उजेड-अंधार’ या एकांकिकेने सांघिक प्रथम क्रमांक पटकावत मानाचा पुरुषोत्तम करंडक आपल्या नावे केला. याच महाविद्यालयाच्या ‘दाग अच्छे है’ या एकांकिकेने द्वितीय क्रमांक, तर फिनोलेक्स अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘वारेबुवा’ या एकांकिकेने तृतीय क्रमांक मिळविला.
महाराष्ट्रीय कलोपासक, पुणे यांच्या वतीने स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत रत्नागिरी, चिपळूण, देवरुख, लांजा, देवगड आदी परिसरांतील १५ महाविद्यालयीन संघांनी सहभाग घेतला. दोन दिवस रंगलेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सामाजिक, कौटुंबिक तसेच समकालीन विषयांवर आधारित विविध एकांकिका सादर करून आपल्या अभिनय, लेखन, दिग्दर्शन आणि रंगमंचीय कौशल्याची प्रभावी झलक दाखवली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे सावरकर नाट्यगृहात दोन दिवस तरुणाईच्या कलाविष्काराचा उत्साहपूर्ण माहोल अनुभवायला मिळाला.
स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा आज (गुरुवार, ता. २७) रोजी उत्साहात पार पडला. यावेळी रत्नागिरीच्या नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, तहसीलदार रामदास म्हात्रे, गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे झोनल मॅनेजर नितीन सिनकर, ज्येष्ठ रंगकर्मी व लेखक अनिल दांडेकर, डॉ. संजय केतकर, परीक्षक डॉ. संजीवकुमार पाटील, चंद्रशेखर कुलकर्णी, मिलिंद कुलकर्णी, पुण्याचे समन्वयक प्रदीप पाटसकर, सुहास नागरे तसेच कोकण समन्वयक प्रा. डॉ. आनंद आंबेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
वैयक्तिक पुरस्कारांमध्येही गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. ‘उजेड-अंधार’चे राज शिंदे यांना सर्वोत्कृष्ट विद्यार्थी दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. सर्वोत्कृष्ट विद्यार्थी लेखकाचा पुरस्कार फिनोलेक्स अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘वारेबुवा’ या एकांकिकेसाठी स्वानंद शेणई यांना देण्यात आला.
‘दाग अच्छे है’मधील तन्वी सावंतदेसाई यांनी सर्वोत्कृष्ट वाचिक अभिनय नैपुण्य पुरस्कार पटकावला, तर ‘उजेड-अंधार’मधील तनिष्का शिरधनकर यांना सर्वोत्कृष्ट अभिनय नैपुण्य पुरस्कार मिळाला. ‘वारेबुवा’मधील शारदा भंडारे यांना अभिनय नैपुण्य अभिनेत्री, तर याच एकांकिकेतील विशाल सुर्वे यांना अभिनय नैपुण्य अभिनेता पुरस्कार प्रदान करण्यात आला.
उल्लेखनीय अभिनयासाठी पाच कलाकारांना अभिनय उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आले. स. ह. केळकर महाविद्यालय, कला, वाणिज्य व विज्ञान, देवगडच्या ‘दशावतार’मधील शिवमणी पाळेकर, आठले-सप्रे-पित्रे वरिष्ठ महाविद्यालय, देवरुखच्या ‘डाईट प्लान’मधील मनाली चव्हाण, गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या ‘दाग अच्छे है’मधील तन्मय डांगे, डी. बी. जे. महाविद्यालय, चिपळूणच्या ‘बायोमॅट्रिक’मधील पृथ्वी मोहिते आणि फिनोलेक्स अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘सदाफुली’मधील प्रार्थना सावंत यांचा यामध्ये समावेश आहे.
पुरुषोत्तम करंडक ही विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला, अभिनयकौशल्याला आणि रंगभूमीवरील प्रयोगशीलतेला चालना देणारी प्रतिष्ठेची स्पर्धा मानली जाते. महाविद्यालयीन विद्यार्थी सामाजिक आणि समकालीन विषय प्रभावीपणे एकांकिकांच्या माध्यमातून मांडत असल्याने या स्पर्धेला विशेष महत्त्व आहे.
रत्नागिरीतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रंगभूमीच्या क्षेत्रात अधिक चांगल्या संधी मिळाव्यात यासाठी रत्नागिरी नगरपालिकेतर्फे सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी अध्यक्षीय भाषणातून दिली. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेसाठी दरवर्षी सावरकर नाट्यगृह मोफत उपलब्ध करून देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. तसेच स्पर्धेपूर्वी विद्यार्थ्यांसाठी अभिनय, दिग्दर्शन आणि रंगभूमीविषयक मार्गदर्शनाचे विशेष शिबिर आयोजित करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. या उपक्रमामुळे रत्नागिरीतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रंगभूमीच्या क्षेत्रात आपल्या कलागुणांना अधिक व्यापक व्यासपीठ मिळण्यास मदत होणार आहे.

