(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैया सामंत यांनी पाचल दौऱ्यादरम्यान पाचल ग्रामपंचायत इमारतीतील कै. ज्ञा. म. नारकर वाचनालयाला सदिच्छा भेट देऊन वाचनालयाच्या कामकाजाची तसेच उपलब्ध सुविधांची पाहणी केली. यावेळी वाचनालयाच्या पदाधिकाऱ्यांकडून आमदार सामंत यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
आमदार किरण सामंत यांच्या वाचनालय भेटीप्रसंगी वाचनालयाचे ज्येष्ठ विश्वस्त व खजिनदार शिरीष सक्रे तसेच कार्यवाह विनायक खानविलकर सर यांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी वाचनालयाच्या विविध उपक्रमांची तसेच वाचकांसाठी उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती पदाधिकाऱ्यांनी आमदार सामंत यांना दिली.
कै. ज्ञा. म. नारकर वाचनालय हे पाचल परिसरातील विद्यार्थी, युवक तसेच वाचनप्रेमी नागरिकांसाठी महत्त्वाचे ज्ञानकेंद्र म्हणून कार्यरत आहे. वाचनालयात विविध विषयांवरील पुस्तके, संदर्भग्रंथ आणि वाचनासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. वाचनालयाच्या माध्यमातून परिसरातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवकांना मोठी मदत होत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
यावेळी वाचनालयाची प्रशस्त व सुसज्ज व्यवस्था पाहून आमदार किरण उर्फ भैया सामंत यांनी समाधान व्यक्त केले. ग्रामीण भागात वाचनाची आवड जोपासण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पोषक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी अशा वाचनालयांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. वाचनालयाच्या पुढील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी राजापूर पंचायत समितीच्या सभापती नंदिनी कदम, पंचायत समिती सदस्या अपेक्षा मासये, वाचनालयाचे उपाध्यक्ष राजन लब्दे, विश्वस्त श्रीकृष्ण सुतार, ग्रंथपाल विठोबा चव्हाण, लिपिक काव्या सुतार यांच्यासह वाचनालयाचे पदाधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक मान्यवर उपस्थित होते. आमदार सामंत यांच्या भेटीमुळे वाचनालयाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

