(देवळे / प्रकाश चाळके)
राजापूर तालुक्यातील मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठक आमदार किरण सामंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत विविध विभागांचे अधिकारी, स्थानिक प्रशासनाचे प्रतिनिधी आणि ग्रामपंचायतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
आगामी पावसाळ्यात उद्भवू शकणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्यावर वेळेत उपाययोजना करण्याच्या दृष्टीने ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार सामंत यांनी सर्व संबंधित विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना देत, नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी आवश्यक ती सर्व कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
बैठकीत रस्त्यांची दुरुस्ती, नालेसफाई, पूरप्रवण भागातील उपाययोजना, वीजपुरवठा सुरळीत ठेवणे, आरोग्य यंत्रणेची तयारी तसेच आपत्कालीन सेवांची तत्परता यावर सविस्तर चर्चा झाली. दरवर्षी पाणी साचणाऱ्या व नुकसान होणाऱ्या भागांवर विशेष लक्ष देण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
“मान्सून काळात नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारीत राहणे आवश्यक आहे. सर्व विभागांनी समन्वयाने काम केल्यास आपत्ती टाळता येऊ शकते,” असे मत आमदार सामंत यांनी व्यक्त केले.
बैठकीदरम्यान विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या तयारीचा आढावा सादर केला. प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेशही देण्यात आले. या बैठकीला उपविभागीय अधिकारी विश्वजित गाताडे, जिल्हा परिषद सदस्य रमेश सूद, पंचायत समिती सदस्य प्रसाद मोहरकर, गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे, नायब तहसीलदार सरफरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

