(रत्नागिरी /प्रतिनिधी)
रत्नागिरी विशेष कारागृहातील न्यायाधीन बंदी दिपक गौराजी गमरे (वय ६५, मूळ रा. कळकवणे, ता. चिपळूण) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अस्थमा आणि अशक्तपणाचा त्रास जाणवत असल्याने त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
गमरे हे रत्नागिरी विशेष कारागृहातील न्यायाधीन बंदी क्र. ६१/२०२६ होते. ११ ऑगस्ट रोजी त्यांना अस्थमा आणि अशक्तपणाचा त्रास जाणवू लागल्याने दुपारी सुमारे २.३० वाजता पोलिस बंदोबस्तात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, रत्नागिरी येथे उपचारासाठी नेण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना आंतररुग्ण म्हणून दाखल करून उपचार सुरू केले. त्यानंतर उपचारादरम्यान २५ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ८.४२ वाजता त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
या घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी शहर पोलिसांनी नोंद घेतली असून बीएनएसएस कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत्यूचे नेमके कारण वैद्यकीय तपासणी व संबंधित प्रक्रियेनंतर स्पष्ट होणार आहे. गमरे यांना अस्थमाचा आजार आणि अशक्तपणाचा त्रास असल्याने त्यांना कारागृहातून रुग्णालयात हलवण्यात आले होते. रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय पथकाकडून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी शहर पोलिसांकडून पुढील आवश्यक कार्यवाही सुरू असून मृत व्यक्तीच्या वारसांबाबतची नोंदही करण्यात आली आहे.

