(राजापूर / रत्नागिरी प्रतिनिधी)
भरदिवसा रस्त्यावर गाडी अडवून तरुणाला आणि त्याच्या मित्राला मारहाण करत फोनपेवरून पैसे उकळल्याची खळबळजनक घटना डोंगर फाटा, राजापूर येथे घडली. या घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, संबंधितांवर गैर कायदा जमाव करणे, जबर मारहाण व जबरदस्तीने पैसे उकळणे आदी गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी शशिकांत शंकर परब (वय ६०, रा. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक १७ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ३.५० च्या सुमारास ते त्यांच्या मुलगा शुभम परब आणि मित्र हर्षल नागेश साटेलकर यांच्यासह मारुती सुझुकी एसएक्स ४ (MH-02-BP-5922) या वाहनाने मुंबईहून वेेगर्ला येथे जात होते. राजापूर ब्रिज पार केल्यानंतर डोंगर फाटा येथे पाठीमागून आलेल्या पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ (MH-18-AJ-7056) वाहनाने त्यांच्या गाडीला डाव्या बाजूने जोरदार धडक दिली. धडक दिल्यानंतर स्कॉर्पिओमधून ७ ते ८ इसम उतरले आणि त्यांनी शुभम परब व हर्षल साटेलकर यांना हाताने मारहाण केली, शिवीगाळ केली तसेच जबरदस्तीने त्यांच्याकडील ४,००० रुपयांची रक्कम फोनपे अॅपवरून ट्रान्सफर करून घेतली.
या संपूर्ण प्रकारामुळे बेशिस्त रस्तेगुंडगिरीचा धक्का बसला असून, पोलिसांनी अभिषेक परमेश्वर लोखंडे व इतर ७-८ अनोळखी इसमांविरोधात गुन्हा रजि. नं. १३४/२०२५ अन्वये भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १८९(२), १९१(२), १९०, १२७(७), ११५(२), ३५२, ३५१(२), ३२४(२), २८१ आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. डोंगर फाटा परिसरात अशा प्रकारे गाडी अडवून दहशत निर्माण केल्याने नागरिकांमध्ये संताप असून, पोलीस तपासाची दिशा व कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अशी गुंडगिरी थांबविणे हीच काळाची गरज
भर रस्त्यात गाडी अडवून, मारहाण करून आणि मोबाईल अॅपवरून पैसे उकळण्याचा प्रकार म्हणजे रस्तेगुंडगिरीचा थरकापजनक प्रकार आहे. हे केवळ गुन्हेगारी कृत्य नाही, तर कायद्याच्या रक्षणाची धज्जी उडवणारा प्रकार आहे. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही एक गंभीर बाब असून, अशा घटनांना वेळीच चाप बसवला नाही तर समाजात भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होईल. अशा टोळक्यांनी सार्वजनिक ठिकाणी दहशत माजवणे, लोकांना धमकावून त्यांच्याकडील रक्कम लाटणे हा स्पष्ट कायद्याचा भंग आहे. पोलिसांनी याची गंभीर दखल घेऊन दोषींवर तात्काळ आणि कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. यासोबतच, अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी रस्त्यांवरील गस्त वाढवणे, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची यंत्रणा मजबूत करणे आणि गुप्त माहिती गोळा करून टोळ्यांचे जाळे उध्वस्त करणे गरजेचे आहे.