(राजापूर /रत्नागिरी प्रतिनिधी)
पर्यटन संचालनालयाच्या माध्यमातून राजापूर शहरात उभारण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी शिवसृष्टी प्रकल्पाच्या बांधकामाचा काही भाग पहिल्याच पावसात कोसळल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेची दखल घेत राजापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अॅड. हुस्नबानू खलिफे यांनी घटनास्थळी भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी ढिसाळ कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित ठेकेदाराच्या कामाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.
राजापूर शहराच्या मध्यवर्ती भागातील ऐतिहासिक ब्रिटिशकालीन वखारीच्या जागेवर पर्यटन संचालनालयामार्फत शिवसृष्टी प्रकल्प उभारण्यात येत असून, या प्रकल्पासाठी शासनाने एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मात्र, पावसाच्या पहिल्याच फेरीत बांधकामाचा काही भाग कोसळल्याने कामाच्या दर्जाबाबत आणि देखरेखीबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. घटनास्थळी पाहणी करताना नगराध्यक्षा खलिफे यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. सार्वजनिक निधीतून उभारल्या जाणाऱ्या प्रकल्पामध्ये दर्जाहीन काम कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी संबंधित ठेकेदाराची जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देश दिले.
यासोबतच या संपूर्ण प्रकरणाची जिल्हाधिकारी तसेच पर्यटन संचालनालयाकडे तातडीने लेखी तक्रार पाठविण्याचे आदेशही त्यांनी नगरपरिषद प्रशासनाला दिले. प्रकल्पाच्या गुणवत्तेची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली. या पाहणीवेळी नगरसेवक तथा पाणीपुरवठा सभापती सौरभ खडपे, कार्यालयीन अधीक्षक जितेंद्र जाधव, अभियंता स्वप्निल पड्यार, आरोग्य निरीक्षक अमित पोवार, मुकादम राजना जाधव, संदेश जाधव तसेच नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शिवसृष्टीसारख्या पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या प्रकल्पाच्या बांधकामाचा भाग पहिल्याच पावसात कोसळल्याने सार्वजनिक निधीच्या वापरावर आणि कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित झाले असून, आता संबंधित यंत्रणा या प्रकरणाची किती गांभीर्याने दखल घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

