(खेड)
खेड तालुक्यात आज सकाळी एक थरारक घटना घडली. भोस्ते घाट परिसरातील मोरवंडे गावाजवळ मुंबई-गोवा महामार्गावर धावत्या वॅगनार कारला अचानक भीषण आग लागली. काही क्षणांतच संपूर्ण वाहन ज्वाळांनी वेढले गेले, त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
खेडहून चिपळूणच्या दिशेने जात असताना कारच्या इंजिनमधून अचानक धूर निघू लागला. चालकाला काही समजण्याच्या आधीच कारने पेट घेतला. आगीची तीव्रता इतकी होती की अवघ्या काही मिनिटांत वाहन पूर्णपणे जळून खाक झाले.
प्रसंगावधान राखत चालकाने जळत्या कारमधून बाहेर उडी मारून आपला जीव वाचवला. मात्र या प्रयत्नात तो गंभीररित्या भाजला गेला असून त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेमुळे काही काळ खेड तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. माहिती मिळताच पोलिस आणि खेड नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे महामार्गावरील वाहनांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

