(खेड)
खोट्या केसमध्ये अडकवण्यासह ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत एका व्यावसायिकाकडे तिघांनी १० लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. या तिघांनी एक लाखाची खंडणीही घेतली असून, तिघांवर खेड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार फेब्रुवारी ते १० एप्रिल या कालावधीत घडला असून, परेश उदय शिंदे (रा. बोरज ता. खेड), सूरज सुरेंद्र पड्याळ (रा. बोरज, ता. खेड), सूरज दिलखुश तांबे, (रा. निगडे, ता. खेड) अशी गुन्हा दाखल केलेल्या तिघांची नावे आहेत. या प्रकाराबाबत विशाल विवेक घोसाळकर (३८, रा. बोरज-घोसाळकरवाडी, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे. तिघांनी खेड येथील तहसीलदार कार्यालयात केमिकल कंपनीतील केमिकल बेकायदेशीररित्या उघड्यावर टाकल्याची तक्रार केली होती. ती मागे घेण्यासाठी तिघांनी विशाल घोसाळकर यांच्याकडे १० लाखांची व महिना १० हजारांची मागणी केली होती. त्यांनी घोसाळकर यांच्याकडून १ लाख रुपये घेतलेही होते. तसेच घोसाळकर यांना अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत, मुंबई-पुणे येथे गँग आहेत, एक गँग बोलावली तर ठार करू, अशी जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत.