( खेड )
मुंबई-गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील भोस्ते घाटात मंगळवारी सकाळी एका डंपरचा अपघात होऊन चालक किरकोळ जखमी झाला. स्थानिकांनी तातडीने मदत करत जखमीला सुरक्षित स्थळी हलवले. मात्र, वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या निष्क्रियतेबाबत नाराजीचा सूर उमटत आहे.
भोस्ते घाटात आतापर्यंत ८० पेक्षा अधिक अपघात झाले असून, अरुंद वळणं, सततचे धुके, घसरते मातीचे तुकडे आणि निकृष्ट रस्ते यामुळे वाहनचालकांचे जीव टांगणीला लागतात. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घाटातील धोकादायक वळणांवर पर्यायी मार्ग व सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात अद्याप ठोस पावले उचललेली नाहीत.
“भोस्ते घाटात सीसीटीव्ही, कठडे, साइन बोर्ड तसेच तीव्र वळणांवर विशेष चेतावणी देणारे उपाय आवश्यक आहेत. अपघातांची संख्या पाहता हा घाट डेंजर स्पॉट ठरत आहे.” असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, या अपघाताची रात्री उशिरापर्यंत अधिकृत नोंद झाली नव्हती. त्यामुळे जखमी व्यक्तीची ओळख स्पष्ट होऊ शकलेली नाही. वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर स्थानिकांकडून पुन्हा एकदा ठोस उपाययोजनांची मागणी करण्यात येत आहे.