(रत्नागिरी /प्रतिनिधी)
घराच्या गॅलरीत बसून अभ्यास करणाऱ्या २१ वर्षीय विद्यार्थ्यावर कोणतेही कारण नसताना शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने अचानक दगड फेकून मारल्याची घटना रत्नागिरी शहरातील तेली आळी, आठवडा बाजार परिसरात घडली. दगड उजव्या हाताच्या मनगटावर लागल्याने विद्यार्थ्याला दुखापत झाली. त्यानंतर संबंधिताने विद्यार्थ्यासह त्याच्या आत्या आणि काकांना शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी कृणाल कृष्णकांत जावकर (वय २१, व्यवसाय : शिक्षण, मूळ रा. जावकरवाडी, विजयदुर्ग, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग; सध्या रा. तेली आळी, आठवडा बाजार, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून ‘कारकर’ नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा क्र. २९०/२०२६ दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २६ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे १ वाजता कृणाल जावकर हे ते राहत असलेल्या घराच्या गॅलरीमध्ये बसून अभ्यास करत होते. त्यावेळी घरासमोर राहणाऱ्या आरोपीने कोणतेही स्पष्ट कारण नसताना त्यांना दुखापत करण्याच्या उद्देशाने दगड फेकून मारला. हा दगड कृणाल यांच्या उजव्या हाताच्या मनगटाला लागला, त्यामुळे त्यांना दुखापत झाली.
दगड मारल्यानंतर संशयित आरोपीने कृणाल तसेच त्यांच्या आत्या आणि काकांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेप्रकरणी शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम १२५(अ) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचे पूर्ण नाव अद्याप समोर आलेले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. घराच्या गॅलरीत बसून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यावर थेट दगडफेक झाल्याने परिसरात या घटनेची चर्चा सुरू झाली आहे. किरकोळ कारणातून वाद वाढत जाऊन थेट दगडफेकीपर्यंत प्रकार पोहोचल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही उपस्थित झाला आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

