(संगमेश्वर / एजाज पटेल)
देवरुख एस. टी. बस स्थानकातील स्थानक प्रमुख कक्षात शासकीय कर्तव्यावर असलेल्या वाहतूक निरीक्षकाला धक्काबुक्की करून शिवीगाळ केल्याची घटना २६ ऑगस्ट रोजी घडली. याप्रकरणी निवे बुद्रुक येथील मिलिंद मुकुंद यादव यांच्याविरोधात देवरुख पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २५ ऑगस्ट रोजी देवरुख ते रत्नागिरी एस. टी. बसमध्ये कर्तव्यावर असलेल्या महिला वाहक रजनी जाधव यांनी एका लहान मुलीकडून तिकिटाचे पैसे घेतले होते. संबंधित मुलगी एस. टी. पासवर नमूद असलेल्या निवे बुद्रुक या थांब्यावर न चढता बावनदी येथून बसमध्ये चढल्याने नियमानुसार तिचे तिकीट काढण्यात आले होते.
या प्रकाराचा राग मनात धरून २६ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे १.१८ वाजता मिलिंद यादव हे पत्नी व दोन लहान मुलांसह देवरुख एस. टी. स्थानकातील स्थानक प्रमुख कक्षात आले. यावेळी त्यांनी कर्तव्यावर असलेले वाहतूक निरीक्षक तुषार श्रीराम कोळी (वय ३४, रा. देवरुख खालची आळी) यांच्याशी वाद घातला.
वाद वाढल्यानंतर यादव यांनी तुषार कोळी यांच्या खाकी गणवेशाची कॉलर पकडून त्यांना स्थानक प्रमुख कक्षाबाहेर ढकलले. त्यानंतर भिंतीवर ढकलून कॉलर पकडून त्यांना मागे-पुढे केल्याचा आरोप आहे. तसेच एस. टी. कर्मचाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेमुळे देवरुख एस. टी. स्थानकात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. याप्रकरणी वाहतूक निरीक्षक तुषार कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून देवरुख पोलिसांनी मिलिंद यादव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

