(मंडणगड/ प्रतिनिधी)
बँक खात्याचे KYC अपडेट करण्याच्या आमिषाला बळी पडत व्हॉट्सॲपवर आलेली लिंक उघडणे एका शेतकऱ्याच्या चांगलेच अंगलट आले. लिंक उघडल्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून तब्बल २ लाख ७६ हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने लंपास करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंडणगड तालुक्यातील पालेकोंड येथे समोर आली आहे. या प्रकरणी मंडणगड पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनिल धोंडू माळी (वय ४७, व्यवसाय : शेती, रा. पालेकोंड, ता. मंडणगड) यांच्या मोबाईल क्रमांकावर २१ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजल्यापासून २२ ऑगस्ट रोजी पहाटे चार वाजेपर्यंतच्या कालावधीत एका मोबाईल क्रमांकावरून व्हॉट्सॲप संदेश आला. या संदेशामध्ये बँक ऑफ इंडियाच्या KYC संदर्भातील APK लिंक असल्याचे नमूद करण्यात आले होते. KYC अद्ययावत करण्याच्या उद्देशाने माळी यांनी संबंधित लिंक उघडली. मात्र, लिंक उघडताच सायबर ठगांनी त्यांना ऑनलाइन फसवणुकीच्या जाळ्यात ओढल्याचे पोलिस तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून वेगवेगळ्या व्यवहारांद्वारे तब्बल ₹२,७६,००० रक्कम परस्पर वळती करण्यात आली.
खात्यातील रक्कम कमी झाल्याचे लक्षात आल्यानंतर माळी यांनी या प्रकाराची माहिती घेत पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी २६ ऑगस्ट रोजी दुपारी ३.५० वाजता मंडणगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात आरोपीने थेट बँकेच्या नावाचा आधार घेत KYC अपडेटच्या नावाखाली APK लिंक पाठवली, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा संदेशांपासून विशेष सावध राहण्याची गरज आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.
बँक, सरकारी यंत्रणा किंवा कोणत्याही विश्वासार्ह संस्थेच्या नावाने मोबाईलवर आलेली APK किंवा संशयास्पद लिंक घाईघाईने उघडू नये. विशेषतः बँक खात्याशी संबंधित माहिती, ओटीपी, पासवर्ड, कार्ड क्रमांक किंवा इतर गोपनीय तपशील कोणालाही देऊ नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. एका क्लिकची किंमत तब्बल २ लाख ७६ हजार रुपये मोजावी लागल्याने मंडणगडमधील या घटनेने सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याची गरज पुन्हा अधोरेखित केली आहे.

