(संगमेश्वर /प्रतिनिधी)
तालुक्यातील दाभोळे बाजारपेठ परिसरात निष्काळजीपणे रिव्हर्स घेतलेल्या डंपरमुळे दुचाकीस्वाराचा अपघात झाल्याची घटना रविवारी पहाटे घडली. या अपघातात दुचाकीचे नुकसान झाले असून संबंधित डंपर चालकाविरुद्ध देवरुख पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अवधुत हरीश्चंद्र बेलकर (वय ३७, रा. बेलकरवाडी, दाभोळे, ता. संगमेश्वर) हे त्यांच्या ताब्यातील होंडा शाईन दुचाकी (एमएच ०८ बीए ५१६७) घेऊन बेलकरवाडीहून रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गाकडे जात होते. दाभोळे बाजारपेठेतील पुलाच्या अलीकडे पोहोचताच समोरील डंपर ट्रक चालकाने रस्त्याची परिस्थिती न लक्षात घेता निष्काळजीपणे वाहन मागे घेतल्याचे सांगितले जाते. आरोपी बेनी नवल सिंह भुमिया (वय ३२, सध्या रा. टाक्याचा माळ, दाभोळे; मूळ रा. जबलपूर,) याने डंपर रिव्हर्स घेताना मागील बाजूस वाहन आहे की नाही याची खात्री न करता वाहन मागे घेतले आणि त्यामुळे दुचाकीला धडक बसली. धडकेनंतर डंपरचे चाक मोटारसायकलवरून गेल्याने वाहनाचे नुकसान झाले.
या प्रकरणी अवधुत बेलकर यांच्या फिर्यादीवरून गु.र. नं. ३७/२०२६ अंतर्गत भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम २८१ तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १८४ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटना २३ मार्च रोजी पहाटे ३.४५ वाजता घडली असून रात्री ९.३४ वाजता देवरुख पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली. पुढील तपास देवरुख पोलिस करत आहेत.

