(संगमेश्वर / एजाज पटेल)
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (एसटी) प्रवाशांना विविध प्रवास सवलतींचा लाभ मिळावा यासाठी ‘एनसीएमसी (NCMC) स्मार्ट कार्ड’ वितरण आणि नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र, संपूर्ण संगमेश्वर तालुक्यासाठी देवरुख आगार येथेच एकमेव नोंदणी केंद्र कार्यरत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे संगमेश्वर बस स्थानकावर स्वतंत्र NCMC स्मार्ट कार्ड नोंदणी केंद्र तातडीने सुरू करावे, अशी आग्रही मागणी भारतीय जनता पक्षाचे संगमेश्वर तालुका उपाध्यक्ष मिथुन निकम यांनी एसटी प्रशासनाकडे केली आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांची मोठी फरफट
संगमेश्वर तालुका हा भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण आणि डोंगराळ भागांनी व्यापलेला आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण तालुक्यासाठी केवळ एकच नोंदणी केंद्र असणे नागरिकांसाठी गैरसोयीचे ठरत आहे. देवरुख परिसरातील नागरिकांना ते केंद्र सोयीचे असले, तरी संगमेश्वर व परिसरातील तसेच दुर्गम गावांतील नागरिकांना केवळ स्मार्ट कार्डासाठी अनेक किलोमीटरचा प्रवास करून देवरुखला जावे लागत आहे. याचा सर्वाधिक फटका ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग आणि विद्यार्थ्यांना बसत असून, त्यांना वेळ, पैसा आणि श्रमांचा अतिरिक्त भार सहन करावा लागत असल्याचे निकम यांनी नमूद केले आहे.
गर्दी, सर्व्हर डाऊन आणि रिकाम्या हाताने परतण्याची वेळ
देवरुख येथील एकमेव केंद्रावर संपूर्ण तालुक्यातील नागरिकांची गर्दी होत असल्याने अनेकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागते. अनेक वेळा तांत्रिक अडचणी, सर्व्हर डाऊन किंवा प्रक्रिया पूर्ण न झाल्याने नागरिकांना काम न होताच परतावे लागते. त्यामुळे एका स्मार्ट कार्डासाठी वारंवार हेलपाटे मारण्याची वेळ येत असून, ग्रामीण भागातील नागरिकांचा आर्थिक आणि मानसिक त्रास वाढत आहे.
परतीची बस चुकण्याची भीती
ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था मुख्यतः एसटी बसवर अवलंबून आहे. देवरुख येथे दिवसभर रांगेत उभे राहिल्यानंतर अनेक प्रवाशांची परतीची शेवटची बस चुकते. त्यामुळे विशेषतः दुर्गम गावांतील नागरिकांना रात्री घरी पोहोचण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होतो.
संगमेश्वर बस स्थानक योग्य पर्याय
संगमेश्वर हे मुंबई-गोवा महामार्ग आणि कोकण रेल्वेशी जोडलेले तालुक्यातील महत्त्वाचे केंद्र आहे. येथे स्वतंत्र NCMC स्मार्ट कार्ड नोंदणी केंद्र सुरू झाल्यास संगमेश्वरसह आसपासच्या शेकडो गावांतील नागरिकांची मोठी गैरसोय दूर होईल. याशिवाय देवरुख केंद्रावरील गर्दी आणि ताणही कमी होऊन दोन्ही भागातील प्रवाशांना अधिक जलद आणि सुलभ सेवा मिळू शकेल.
तातडीने निर्णय घेण्याची मागणी
ग्रामीण नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन एसटी प्रशासनाने संगमेश्वर बस स्थानकावर स्वतंत्र NCMC स्मार्ट कार्ड नोंदणी केंद्र तातडीने सुरू करावे, अशी आग्रही मागणी भाजपचे संगमेश्वर तालुका उपाध्यक्ष मिथुन निकम यांनी केली असून, या मागणीला तालुक्यातील प्रवासी आणि नागरिकांकडूनही मोठा पाठिंबा मिळत आहे.

