(रत्नागिरी / वार्ताहर)
आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान, समर्पित सेवा आणि सामाजिक बांधिलकीची दखल घेत प्राथमिक आरोग्य केंद्र, मालगुंड (ता. रत्नागिरी) येथील आरोग्य निरीक्षक डॉ. परशुराम तुकाराम निवेंडकर यांना ‘Lal Bahadur Shastri Ji Adarsh Seva Award’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
Independence India Honour Foundation, उत्तराखंड यांच्या वतीने हा सन्मान प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे प्रमाणपत्र जारी करण्यात आले असून, प्रमाणपत्रावर Reg. No. 26/1655 असा नोंदणी क्रमांक नमूद आहे.
डॉ. निवेंडकर यांनी आरोग्यसेवेसोबतच सामाजिक, शैक्षणिक आणि विविध सामाजिक उपक्रमांमध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याची यापूर्वीही दखल घेण्यात आली आहे. त्यांच्या कार्याबद्दल विश्व मानवाधिकार सुरक्षा आयोगाच्या वतीने डॉक्टरेट, दैनिक नवराष्ट्र मुंबईचा आदर्श आरोग्य सेवा पुरस्कार, नॅब हॉस्पिटल चिपळूण यांचा नेत्र तपासणीतील उल्लेखनीय कार्य पुरस्कार, कोविड योद्धा सन्मान तसेच रविदास परिषदेतर्फे पुरस्कार अशा विविध सन्मानांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.
आरोग्यसेवा क्षेत्रातील उत्कृष्ट योगदान, सेवाभाव, समर्पण आणि समाजहितासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन ‘लाल बहादूर शास्त्रीजी आदर्श सेवा पुरस्कार’ प्रदान करण्यात आल्याचे प्रमाणपत्रात नमूद करण्यात आले आहे.
डॉ. निवेंडकर यांच्या या सन्मानाबद्दल जिल्हा परिषद रत्नागिरीचे अधिकारी व पदाधिकारी, आरोग्य विभागातील सहकारी, मित्रपरिवार तसेच विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या सेवाभावी कार्यामुळे आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना प्रेरणा मिळत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

