(रत्नागिरी /प्रतिनिधी)
रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव आणि निष्काळजीपणे मालवाहू वाहन चालविल्याने घराच्या दुरुस्तीचे काम करणाऱ्या एका कामगाराला दुखापत झाल्याची घटना रत्नागिरीतील गवळीवाडा, धनजीनाका उतार येथे घडली. अरबाड़ा अन्वर मेमन (वय २८, रा. केबल गल्ली, समीर अपार्टमेंटजवळ, रत्नागिरी) याने चालविलेल्या बजाज मॅक्सिमा कार्गो वाहनाची रस्त्यालगत उभ्या असलेल्या शिडीला धडक बसल्याने शिडीवर काम करणारे सुरेश गोविंद पंडित (वय ५९, रा. पोचरी, माईंगडेवाडी, ता. संगमेश्वर) यांच्या खांद्याला फ्रॅक्चर झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, ८ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास गवळीवाडा, धनजीनाका उतार येथे सुशील मांडवकर यांच्या घराच्या वास्यांची दुरुस्ती करण्याचे काम सुरू होते. यावेळी सुरेश पंडित हे शिडीवर उभे राहून काम करीत होते. त्याचदरम्यान आरोपी अरबाड़ा मेमन हा आपल्या ताब्यातील बजाज मॅक्सिमा कार्गो वाहन (क्रमांक एमएच ०८ एएक्यू ९९०४) घेऊन धनजीनाका उतारावरून खाली येत होता. मात्र, उतारावरील रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता वाहन वेगात व निष्काळजीपणे चालविल्याने त्यावरील नियंत्रण सुटून वाहनाची शिडीला धडक बसली. या धडकेत सुरेश पंडित जखमी झाले. त्यांच्या खांद्याला फ्रॅक्चर होऊन दुखापत झाली.
या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार राकेश भगवान बागल (वय ४८) यांनी फिर्याद दिली आहे. तब्बल दोन महिन्यांनंतर म्हणजेच १७ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री १०.१४ वाजता गुन्ह्याची नोंद करण्यात आली. आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रत्नागिरी शहर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.


