(रत्नागिरी)
रत्नागिरी तालुक्यातील कुर्धे परिसरातील कातळ भागात अचानक भडकलेल्या वणव्यामुळे पावस–पूर्णगड मार्गावरील निकिता राजेंद्र रसाळ यांच्या हार्डवेअर गोदामाला मंगळवारी सकाळी आग लागून मोठे नुकसान झाले. या आगीत अंदाजे ₹26 लाख 17 हजारांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून थंडीची लाट असल्याने परिसरात जोरदार वारे वाहत आहेत. कातळ परिसरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात उगवणाऱ्या गवताला सहजपणे वणवा लागतो. मंगळवारी सकाळीही वार्याच्या वेगामुळे गवत पेटत गेले व हा वणवा गोदामापर्यंत पोहोचला.
रसाळ यांचे मुख्य दुकान पावस येथे असून कुर्धे येथील गोदामात इलेक्ट्रिक साहित्य, रंगाचे डबे, ताडपत्र्या, पाण्याच्या टाक्या तसेच इतर प्लास्टिक साहित्य साठवले होते. वणव्याच्या झळेमुळे हे संपूर्ण साहित्य जळून खाक झाले.
आगीची माहिती मिळताच रत्नागिरी नगर परिषद व फिनोलेक्स कंपनीच्या अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.
घटनास्थळी मेर्वी येथील तलाठी श्रीमती मीनाक्षी कदम यांनी पंचनामा केला. यावेळी पोलीस पाटील, पोलीस अंमलदार, गोदाम मालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

