(ठाणे / वृत्तसंस्था)
आदिवासी विद्यार्थिनींना सुरक्षित वातावरणात शिक्षण मिळावे, यासाठी शासनाकडून आश्रमशाळांमध्ये विविध उपाययोजना केल्या जात असताना ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. टेंभा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील तब्बल 21 अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा आरोप एका कर्मचाऱ्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी शहापूर पोलिसांनी पॉक्सो कायद्यासह भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.
गणपत गवळी झिपरू असे अटक करण्यात आलेल्या आरोपी कर्मचाऱ्याचे नाव आहे. तो आश्रमशाळेत स्वयंपाक्याचा मदतनीस म्हणून काम करत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेंभा गावाच्या हद्दीत शासकीय आदिवासी आश्रमशाळा असून याच ठिकाणी हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
आश्रमशाळेच्या एकाच इमारतीमध्ये विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची व्यवस्था आहे. दुसऱ्या मजल्यावर मुलांचे, तर तिसऱ्या मजल्यावर मुलींचे वसतिगृह आहे. कपडे धुण्यासाठी तसेच जेवणासाठी विद्यार्थिनींना तिसऱ्या मजल्यावरून खाली ये-जा करावी लागते. याच दरम्यान आरोपी कर्मचारी विद्यार्थिनींना त्रास देत असल्याचा आरोप आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला आरोपीने एकटी गाठून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. घडलेला प्रकार विद्यार्थिनीने आश्रमशाळेच्या अधीक्षकांना सांगितल्यानंतर प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर अधीक्षक आणि पीडित विद्यार्थिनींनी शहापूर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
या तक्रारीनंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील कलम 354 तसेच पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपी गणपत गवळी याला अटक करून न्यायालयीन प्रक्रियेनंतर आधारवाडी कारागृहात पाठवण्यात आले आहे.
दरम्यान, आरोपीने यापूर्वीही आश्रमशाळेतील विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची माहिती तपासात समोर आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास कदम यांनी सांगितले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास अधिक गंभीरपणे केला जात असून आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
या घटनेमुळे आदिवासी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी असलेल्या यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित प्रशासनाकडून या प्रकरणी कठोर कारवाई आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांची मागणी पालकांकडून होत आहे.

