(रत्नागिरी / चिपळूण प्रतिनिधी)
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या शिरगाव-तळसर गावाच्या परिसरातील जंगल पुन्हा एकदा वाघाच्या डरकाळ्यांनी थरारले आहे. दोन दिवसांपूर्वी या भागात पट्टेरी वाघाच्या स्पष्ट डरकाळ्या ऐकू आल्याची नोंद झाल्यानंतर त्याच परिसरात वाघाच्या पंजाचे ठसे आढळून आले. या घटनेनंतर जिल्हा वनविभाग सतर्क झाला असून सोमवारी सायंकाळी पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
वनपाल एस. एस. सावंत, वनरक्षक राहुल गुंठे व कृष्णा इरमले यांच्या पथकाने वस्तीपासून तब्बल सहा किलोमीटर अंतरावर जंगलात पाहणी करत चार ट्रॅप कॅमेरे बसवले आहेत. मिळालेल्या पंजाच्या ठशांचे प्लॅस्टर कास्टींग करण्यात आले असून प्रयोगशाळा तपासणीसाठी काही नमुनेही संकलित करण्यात आले आहेत. पंजाचा आकार सुमारे सतरा सेंटीमीटर असून, प्राथमिक तपासणीत हा नर वाघ असल्याचा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. गेल्या वर्षी याच परिसरातील तळसर जंगलातही वाघाच्या हालचालींचे संकेत मिळाले होते. त्या वेळी मौशीच्या शिकार करण्याच्या पद्धतीवरून व पंजाच्या आकारावरून वनविभागाने पाच ट्रॅप कॅमेरे बसवले होते. मात्र पुढील काही महिन्यांत कोणतीही हालचाल नोंदवली गेली नव्हती. यावर्षी जानेवारीत पुन्हा काही पाऊलखुणा दिसून आल्या होत्या.
दरम्यान, या परिसरात रानकुत्र्यांवरील संशोधनासाठी पीएच.डी. करीत असलेली संशोधक राणी प्रभुलकर हिने नुकत्याच जंगलात स्पष्ट वाघाच्या डरकाळ्या ऐकल्या. त्यानंतर तिला वाघाच्या पावलांचे ठसेही दिसून आल्याने तिने तत्काळ वनविभागाला माहिती दिली. वनविभागाच्या प्राथमिक तपासणीनुसार, हा वाघ सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य जंगल पट्ट्यातून खाद्य व पाण्याच्या शोधात खाली उतरल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढील काही दिवसांत ट्रॅप कॅमेऱ्यांमधून मिळणाऱ्या दृश्यांवरून वाघाच्या हालचालींचे अचूक निरीक्षण करण्यात येणार आहे. वनविभागाने स्थानिकांना जंगल परिसरात अनावश्यक वावर टाळण्याचे तसेच कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित कळविण्याचे आवाहन केले आहे.

