(देवळे / प्रकाश चाळके)
शासनाने कोकणातील शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली आंबा-काजू पिकांची हेक्टरी २२ हजार ५०० रुपयांची नुकसान भरपाई अद्याप अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. गावनिहाय नुकसान भरपाईच्या याद्या जाहीर झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून केवायसीही केली आहे. मात्र, या प्रक्रियेला जवळपास महिना उलटूनही नुकसान भरपाईची रक्कम खात्यात जमा न झाल्याने शेतकरी आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.
नुकसान भरपाईची रक्कम खात्यात जमा झाली आहे का, याची खात्री करण्यासाठी शेतकरी वारंवार बँकेत जाऊन चौकशी करत आहेत. मात्र, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करूनही रक्कम जमा झालेली नसल्याने त्यांना निराश होऊन परतावे लागत आहे. शेतीच्या नुकसानीमुळे आधीच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीची प्रतीक्षा करावी लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. कागदपत्रांची पूर्तता झालेल्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम तातडीने जमा करावी, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, शासनाच्या सरसकट कर्जमाफीच्या घोषणेनेही शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सरसकट माफ करण्यात येणार असल्याच्या घोषणेने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. मात्र, बँक स्तरावरून मिळणाऱ्या माहितीनुसार, दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीऐवजी ५० हजार रुपयांची सानुग्रह मदत देण्यात येणार असल्याचेही सांगितले जात आहे. ही मदत तातडीने मिळणार नसून काही महिन्यांनंतर जमा होण्याची शक्यता असल्याची माहिती शेतकऱ्यांना दिली जात आहे.
त्यामुळे ‘सरसकट दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी’ या घोषणेचा नेमका अर्थ काय, असा प्रश्न शेतकरी वर्गातून उपस्थित होत आहे. नियमितपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण असून, आपले दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होईल, या आशेवर अनेक शेतकरी आहेत. शासनाच्या घोषणेबाबत स्पष्टता नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे.
शासनाने कर्जमाफीच्या घोषणेचा स्पष्ट खुलासा करून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे. तसेच आंबा-काजू नुकसान भरपाईसाठी पात्र ठरलेल्या आणि सर्व कागदपत्रांची पूर्तता केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात गणेशोत्सवापूर्वी तरी नुकसान भरपाईची रक्कम जमा करावी, अशी जोरदार मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे.

