(रत्नागिरी / वार्ताहर)
गेल्या काही दिवसांपासून सूर्य राज्यभर आग ओकत आहे. या वाढत्या तापमानामुळे उकाड्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांना कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत शरीराला नैसर्गिक थंडावा देणाऱ्या ताडगोळ्यांकडे नागरिकांचा कल वाढताना दिसत आहे. रस्त्याच्या कडेला झाडांच्या सावलीत बसून रसाळ, गोड ताडगोळे विकणाऱ्या विक्रेत्यांकडे सध्या ग्राहकांची चांगलीच गर्दी पाहायला मिळत आहे.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील तापमानात सातत्याने वाढ होत आहे. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता जाणवत असल्याने अनेक जण ऊसाचा रस, शहाळे आणि कैरीचे पन्हे यांसारख्या पारंपरिक पेयांचा आधार घेत आहेत. मात्र सध्या पांढऱ्या शुभ्र, मऊ आणि गोड चवीच्या ताडगोळ्यांनी स्थानिकांसह पर्यटकांनाही आकर्षित केले आहे.
नैसर्गिक थंडावा देणारे ‘आइस ॲपल’
ताडगोळे हे शरीराला शीतलता देणारे व आरोग्याच्यादृष्टीने लाभदायी असून ते उन्हाळी फळ म्हणून ओळखले जाते. ताडगोळे हे पारदर्शक खोबऱ्यासारखे दिसणारे, गोड-तुरट चवीचे आणि शरीरातील उष्णता कमी करणारे फळ आहे. त्यामुळे उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी हा एक उत्तम नैसर्गिक पर्याय मानला जातो. ‘आइस ॲपल’ म्हणून ओळखले जाणारे हे फळ मार्च ते जून या कालावधीत मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. पावसाळा सुरू होईपर्यंत त्याची मागणी कायम टिकून असते.
विक्रेत्यांना चांगला व्यवसाय
ताडगोळ्यांची वाढती मागणी पाहता विक्रेत्यांना याचा चांगला फायदा होत आहे. विक्रेते संदीप बन्सल सांगतात, “उन्हाचा पारा वाढत असल्याने ग्राहकांची मागणी वाढली आहे. सर्व खर्च वजा करता दिवसाकाठी 600 ते 900 रुपयांपर्यंत नफा मिळतो. उन्हाळ्याचे हे दोन महिने आमच्या कुटुंबासाठी महत्त्वाचे ठरतात.”
सध्या डझनभर ताडगोळ्यांची किंमत 90 ते 150 रुपये दरम्यान असून, आकारानुसार दर बदलत असतात. ताजे ताडफळ फोडून त्यातील गोळे ग्राहकांना दिले जातात, त्यामुळे ताजेपणा टिकून राहतो.
ताडगोळ्यांच्या या व्यवसायामुळे ग्रामीण भागातील उत्पादक शेतकरी आणि आदिवासी बांधवांना उन्हाळ्यात दोन ते तीन महिन्यांसाठी रोजगार मिळतो. त्यामुळे हा व्यवसाय केवळ शहरातील मागणी पूर्ण करत नाही, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही हातभार लावतो. सध्या महामार्ग तसेच मुख्य रस्ते, बाजारपेठा आणि पर्यटनस्थळांवर ताडगोळे विक्रेत्यांची लगबग वाढली आहे. उन्हाच्या कडक झळांमध्ये नागरिकांसाठी ताडगोळे हे केवळ फळ नसून, नैसर्गिक थंडाव्याचा आणि आरोग्य जपण्याचा सोपा उपाय बनला आहे.

