(रत्नागिरी /प्रतिनिधी)
कोकणातील प्रमुख पर्यटनस्थळ असलेल्या गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर जलक्रीडा व्यावसायिकांच्या बेदरकारपणाचा आणि नफाखोर वृत्तीचा प्रत्यय देणारी धक्कादायक घटना घडली आहे. किनाऱ्यावरील पाण्यात मनमुराद आनंद लुटणाऱ्या पर्यटकांना भरधाव वेगाने आलेल्या ‘जेट स्की’ने (स्पीड बोट) जोरदार धडक दिल्याने महिलेसह दोघे जण जखमी झाले. २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला असून, याप्रकरणी जयगड पोलीस ठाण्यात अज्ञात जेट स्की चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाणे पश्चिम येथील कळवा परिसरातील रहिवासी सौ. मृणाल जीवन पुळेकर (वय ५३) आणि त्यांचे सहकारी गणपतीपुळे येथील समुद्रकिनाऱ्यावर पाण्यात खेळत होते. याच दरम्यान, एका अज्ञात चालकाने आपल्या ताब्यातील जेट स्की अत्यंत बेदरकारपणे आणि भरधाव वेगाने चालवत थेट पर्यटक असलेल्या भागात आणली. पाठीमागून आलेल्या या वेगवान जेट स्कीने पुळेकर आणि त्यांच्या सहकाऱ्याला जोरदार धडक दिली. या अनपेक्षित धडकेमुळे दोघांनाही लहान-मोठ्या स्वरूपाच्या दुखापती झाल्या आहेत. या दुर्घटनेमुळे गणपतीपुळेसह जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर सुरू असलेल्या अनियंत्रित जलक्रीडा व्यवसायाचा धोकादायक कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी जलक्रीडा वाहनांचे मार्ग आणि पोहणाऱ्या पर्यटकांचे क्षेत्र स्वतंत्र ठेवणे बंधनकारक आहे. मात्र, जास्तीत जास्त फेऱ्या मारून पैसे कमावण्याच्या नादात जलक्रीडा व्यावसायिकांकडून सुरक्षेचे सर्व निकष सर्रास पायदळी तुडवले जात आहेत. किनाऱ्यालगत जिथे पर्यटक पाण्यात उतरतात, तिथेच भरधाव वेगाने जेट स्की घुसवून हे चालक पर्यटकांच्या जीवाशी खेळ करत आहेत. प्रशासनाचा या व्यवसायावर कोणताही वचक उरलेला नसल्यानेच असे प्रकार वाढत असल्याची संतप्त भावना पर्यटकांतून व्यक्त होत आहे.
अपघातानंतर सौ. मृणाल पुळेकर यांनी जयगड पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात जेट स्की चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २८२ आणि १२५(अ) तसेच भारतीय दंड विधानातील कलम ३३७ व २८० अन्वये गुन्हा नोंदवला आहे. जयगड पोलीस या अज्ञात चालकाचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे.


