( रत्नागिरी /प्रतिनिधी )
तब्बल अनेक दशके महसूल यंत्रणेकडे न्यायासाठी पाठपुरावा करूनही आपल्या जमिनीच्या हक्काचा प्रश्न मार्गी लागत नसल्याच्या निषेधार्थ आत्मदहनाचा इशारा देणारे संगमेश्वर तालुक्यातील शिवणे येथील पर्शराम लक्ष्मण शिंदे शनिवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर दाखल झाले. आत्मदहनासारखा टोकाचा निर्णय घेण्याच्या स्थितीत प्रकरण पोहोचताच प्रशासनाने त्यांना लेखी पत्र देत २८ ऑगस्ट २०२६ पूर्वी अपीलाचा निर्णय निर्गमित करण्याची तजवीज असल्याचे स्पष्ट केले. या लेखी आश्वासनानंतर शिंदे यांनी आजचा आत्मदहनाचा निर्णय स्थगित केला; मात्र अपेक्षित आदेश आपल्या म्हणण्यानुसार न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, रत्नागिरी जीवन देसाई यांच्या स्वाक्षरीने देण्यात आलेल्या पत्रात मौजे शिवणे, ता. संगमेश्वर येथील सर्वे क्रमांक ८ मधील जमीन मिळकतीसंदर्भातील आरटीएस/अपील/०१/२०२६ या अपिलाची अंतिम सुनावणी पूर्ण झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. या अपिलाचा निर्णय २८ ऑगस्ट २०२६ पूर्वी निर्गमित करण्याची तजवीज ठेवण्यात येत असल्याचे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, याच पत्रात शिंदे यांनी आत्मदहनासारखा टोकाचा मार्ग अवलंबू नये, असे सांगताना, त्याउपरही असा मार्ग स्वीकारल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी त्यांची राहील, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
हे देखील वाचा: आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाचे पत्र; शिंदेंचा संतप्त सवाल “फेरफार २१५३चा आमच्या कुळहक्काशी संबंध काय?”
पर्शराम शिंदे हे सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर दाखल झाले होते. काही तासांनंतर आत्मदहनाचा निर्णय घेण्याची वेळ येण्यापूर्वी प्रशासनाकडून त्यांना लेखी पत्र देण्यात आले. त्यामुळे एखाद्या वृद्ध नागरिकाच्या प्रलंबित महसूल प्रश्नाकडे वेळेत लक्ष देण्यासाठी प्रशासनाला आत्मदहनाच्या इशाऱ्याचीच प्रतीक्षा होती का? असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. वर्षानुवर्षे अर्ज, अपील, सुनावण्या आणि आदेशांच्या प्रक्रियेत अडकलेल्या या प्रकरणात अखेर ‘निर्णयाची तारीख’ लेखी स्वरूपात देण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. त्यामुळे आता केवळ आश्वासन नव्हे, तर दिलेल्या मुदतीत प्रत्यक्ष आदेश निघतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लेखी आश्वासनावर आत्मदहन स्थगित; मात्र इशारा कायम
आत्मदहनाचा निर्णय स्थगित केल्यानंतर शिंदे यांनी सांगितले आहे की, संबंधित जमीनप्रकरणात १३८ रुपये अनामत ठेवून क्षेत्र कुळाच्या नावावर कब्जेदार सदरी दाखल झाल्याची नोंद आहे. त्यानंतर झालेल्या आदेशानुसार १७२ रुपये भरणा करून तीन हेक्टर क्षेत्र कुळाच्या नावावर सातबारा सदरी दाखल करण्याचा निर्णय मिळावा,बाकी काहीही माझे म्हणणे नाही असे त्यांनी सांगितले. तसेच प्रशासनाकडून २८ ऑगस्टपूर्वी निर्णय देण्याचे लेखी पत्र मिळाल्यानंतर शिंदे यांनी आजचा आत्मदहनाचा निर्णय स्थगित केला आहे. मात्र, “दिलेल्या लेखी आश्वासनानुसार निर्णय झाला नाही, तर २६ जानेवारी २०२७ रोजी पुन्हा आत्मदहनाचे निवेदन देऊन आत्मदहन करणार,” असा इशारा त्यांनी दिल्याचे सांगितले. त्यामुळे आता या प्रकरणाची खरी कसोटी प्रशासनाची असल्याचे चित्र दिसून येत आहे.

