(देवरूख / वार्ताहर)
देवरूखचे विश्वविक्रमी रांगोळी कलाकार श्री. विलास विजय रहाटे यांनी ‘संस्कार भारती आणि पोट्रेट रांगोळी स्पर्धा : २०२६’मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि संस्कार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत त्यांनी पोट्रेट रांगोळी प्रकारात विजेतेपद पटकावले. या यशाबद्दल त्यांना १ लाख रुपयांचे पारितोषिक, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेचे आयोजन दोन टप्प्यांत करण्यात आले होते. पहिल्या टप्प्यात स्पर्धकांना २.५ फूट x ३ फूट आकाराची पोट्रेट रांगोळी साकारून तिचा ऑनलाइन फोटो दि. ९ नोव्हेंबर, २०२६ पर्यंत पाठवायचा होता. प्राथमिक फेरीत सुमारे २०० रांगोळी कलाकारांनी सहभाग नोंदवला. त्यातून अंतिम फेरीसाठी १२ कलाकारांची निवड करण्यात आली.
अंतिम फेरी डोंबिवली येथील गणेश मंदिरात पार पडली. या फेरीसाठी कलाकारांना स्वतः स्केच तयार करून रांगोळी साकारण्याचे आव्हान देण्यात आले होते. त्यासाठी दि. २३ नोव्हेंबर, २०२६ रोजी संध्याकाळी ७:०० वाजल्यापासून दि. २४ नोव्हेंबर, २०२६ रोजी दुपारी १२:०० वाजेपर्यंतचा कालावधी निश्चित करण्यात आला होता.
या अंतिम स्पर्धेत विलास रहाटे यांनी अमेरिकन आदिवासी महिलेचे आकर्षक पोट्रेट रांगोळीतून साकारले. या यशाविषयी अनुभव सांगताना त्यांनी नमूद केले की, स्पर्धेत अनेक दिग्गज रांगोळी कलाकार सहभागी झाल्यामुळे रांगोळीसाठी योग्य छायाचित्राची निवड करणे हीच मोठी कसोटी होती. अखेर त्यांना मनासारखा अमेरिकन आदिवासी महिलेचा फोटो मिळाला. आयोजकांनी निश्चित केलेल्या वेळेत स्वतः स्केच तयार करून कोणतीही विश्रांती न घेता त्यांनी मोठ्या मेहनतीने रांगोळी पूर्ण केली.
कलेवरील श्रद्धा आणि प्रेम, स्वतःच्या मेहनतीवर असलेला विश्वास तसेच मनातील जिद्द यामुळेच यशाचा मार्ग गवसल्याचे विलास रहाटे यांनी विनम्रपणे सांगितले. त्यांच्या या यशामुळे देवरूखच्या कलाक्षेत्राचा गौरव झाला आहे.


