(रत्नागिरी /प्रतिनिधी)
शहरातील रस्ते विकासाचे काम करणाऱ्या ‘रवी इन्फ्राबिल्ड’ (Ravi Infrabuild) या ठेकेदार कंपनीच्या अक्षम्य बेफिकिरीमुळे एका निरपराध सायकलस्वाराला आपला जीव गमवावा लागला आहे. नाचणे येथील टी.आर.पी. परिसरात या कंपनीच्या भरधाव ‘ग्रेडर’ यंत्राने सायकलला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने रघुनाथ बाबी झोरे (वय ५०, सध्या रा. हिंदू कॉलनी, मूळ रा. वेतोशी) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातानंतर जखमीला मदत न करता घटनास्थळावरून पळ काढणाऱ्या ग्रेडरचालक कमलेश कुमार मांझी (वय २७, रा. बिहार) याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रघुनाथ झोरे हे २३ नोव्हेंबर रोजी आपल्या सायकलवरून मारुती मंदिर ते खेडशी या मार्गावरून मार्गक्रमण करत होते. नाचणे येथील अविष्कार मतिमंद मुलांच्या शाळेसमोरील टी.आर.पी. मुख्य रस्त्यावरून जात असताना, रस्ता सपाटीकरण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ‘रवी इन्फ्राबिल्ड’ कंपनीच्या सहा चाकी अवाढव्य ग्रेडरने त्यांच्या सायकलला पाठीमागून जोरदार धडक दिली. चालक कमलेश मांझी याने अत्यंत निष्काळजीपणे आणि बेदरकारपणे हे अवजड यंत्र चालविल्याने झोरे यांच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत होऊन त्यातच त्यांचा करुण अंत झाला.
या दुर्घटनेमुळे रत्नागिरीतील रस्ते कामांचा ठेका घेतलेल्या ‘रवी इन्फ्राबिल्ड’ कंपनीचा गलथान आणि बेजबाबदार कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. अशा भोंगळ कारभारामुळे रस्ते कामाचे हे प्रकल्प नागरिकांच्या जीवावर उठले आहेत. या अपघातानंतर माणुसकी विसरून चालकाने जखमीला रुग्णालयात नेण्याऐवजी किंवा पोलिसांना कळविण्याऐवजी घटनास्थळावरून पोबारा केला. याप्रकरणी मृताचे पुतणे अरुण बाबू झोरे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यानुसार पोलिसांनी गुन्हा रजिस्टर क्रमांक ४७८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १८४, १३४(ब) आणि १७७ नुसार गुन्हा नोंदवला आहे. शहर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


