(दापोली / वार्ताहर)
मुंबई येथे नुकत्याच झालेल्या ‘मुंबई श्रावण क्वीन’ स्पर्धेत रुईने आपल्या आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्वासह हजरजबाबीपणा आणि विविध कलागुणांच्या जोरावर परीक्षकांची मने जिंकली. अंतिम फेरीतील प्रश्नाचे तिने दिलेले अचूक आणि प्रभावी उत्तर तिच्या विजयात महत्त्वाचे ठरले.
‘आयुष्यातील कोणता एक निर्णय बदलायला आवडेल आणि का?’ या पेचात टाकणाऱ्या प्रश्नाचे अवघ्या ९० सेकंदांत नेमके आणि प्रभावी उत्तर देत दापोली तालुक्यातील शिरशिंगे गावची रुई रवींद्र जाधव हिने महाराष्ट्र टाइम्स आयोजित ‘मुंबई श्रावण क्वीन’चा किताब पटकावला.
शिक्षण, कला, व्यवसाय आणि प्राणीकल्याण अशा विविध क्षेत्रांत रुईने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिने मास मीडिया जर्नालिझममध्ये पदवी घेतली असून एमजीएम विद्यापीठ आणि युनिसेफच्या माध्यमातून ‘ग्रीन जर्नालिझम’ विषयातील शॉर्ट कोर्सही पूर्ण केला आहे.
शिक्षणासोबतच तिने कलाक्षेत्राचीही वाट धरली. सध्या ती फिल्म मेकिंगचे धडे घेत असून दिग्दर्शन हा तिचा मुख्य विषय आहे. तिने वेब सीरिजमध्ये काम केले असून व्यावसायिक नाटकांतही ती कार्यरत आहे. कथकचे प्रशिक्षण ती सध्या घेत आहे, तर मर्दानी खेळाचे प्राथमिक प्रशिक्षणही तिने घेतले आहे. तिच्यातील कवयित्रीची झलक ‘युवर्स लविंगली, रु’ या प्रसिद्ध झालेल्या कविता संग्रहातून दिसून येते.
रुईने व्यवसाय क्षेत्रातही पाऊल ठेवले असून तिचा ‘अंबर’ हा स्टायलिंग स्टुडिओ आहे. यासोबतच ती प्राणीकल्याणाच्या कार्यातही सक्रिय आहे. मुक्या प्राण्यांप्रती संवेदनशील असलेल्या रुईकडून दररोज सुमारे ३० ते ३५ कुत्र्यांना अन्न दिले जाते.
आपल्या विविध कलागुणांच्या आणि सामाजिक बांधिलकीच्या जोरावर रुईने आजवर अनेक पुरस्कार मिळवले आहेत. आता ‘मुंबई श्रावण क्वीन’चा किताब पटकावत तिने आपल्या व्यक्तिमत्त्वाची आणखी एक नवी ओळख निर्माण केली आहे. दापोली तालुक्यातील शिरशिंगे गावच्या रुईच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

