(राजापूर / तुषार पाचलकर)
शिवसेना तळवडे-पाचल विभाग, युवासेना आणि महिला आघाडीच्या वतीने भव्य ‘दहीहंडी उत्सव २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. येत्या ५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता पाचल येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा उत्सव रंगणार आहे.
पाचलच्या इतिहासात प्रथमच सात थरांचे थरारक गोविंदा पथक दहीहंडी फोडणार असल्याने यंदाच्या उत्सवाचे विशेष आकर्षण ठरणार आहे. सात थरांची मानवी मनोरा रचत गोविंदा पथक दहीहंडी फोडण्याचा थरार पाहण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे.
उत्सवाच्या निमित्ताने एकूण १ लाख ५५ हजार ५५५ रुपयांची रोख बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे दहीहंडी फोडण्यासाठी सहभागी होणाऱ्या गोविंदा पथकांमध्येही मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. यासोबतच मराठी आणि हिंदी गाण्यांचा धमाकेदार लाईव्ह ऑर्केस्ट्राही आयोजित करण्यात आला आहे.
दहीहंडी उत्सवातील हा अभूतपूर्व थरार आणि मनोरंजनाचा अनुभव घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पाचल व तळवडे शिवसेना विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

