(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर शहरातील मधीलवाडा येथील ७५ वर्षीय वृद्ध बेपत्ता झाल्याची नोंद राजापूर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. कलामउद्दीन दादू वाडकर असे बेपत्ता झालेल्या वृद्धाचे नाव आहे. ते २२ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी राजापूर येथील घरातून कोणालाही काही न सांगता निघून गेले. त्यानंतर नातेवाईक तसेच परिसरात शोध घेऊनही त्यांचा ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे २३ ऑगस्ट रोजी राजापूर पोलिस ठाण्यात नापत्ता नोंद करण्यात आली.
कलामउद्दीन वाडकर यांचे वय ७५ वर्षे असून अंगामध्ये निळ्या उभ्या रेषा असलेला पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि ग्रे रंगाची फुल पॅन्ट असा त्यांचा पोशाख आहे. त्यांचा रंग गोरा असून उंची सुमारे पाच फूट पाच इंच आहे. डोळे काळे असून केस व दाढी पांढरी आहे. त्यांच्या उजव्या हातात स्टीलची काठी, सोबत निळ्या रंगाची पिशवी आणि काळी छत्री आहे. तसेच कंबरेच्या डाव्या बाजूस ऑपरेशन झालेल्या ठिकाणी टाके आहेत.
या प्रकरणाचा तपास राजापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. बेपत्ता वृद्धाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून परिसरात चौकशी व शोधमोहीम राबविण्यात येत आहे. कलामउद्दीन वाडकर यांच्याबाबत कोणाला माहिती मिळाल्यास त्यांनी तातडीने राजापूर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

