(दापोली/ रत्नागिरी प्रतिनिधी)
पार्किंगच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाने दापोलीत हिंसक वळण घेत कारची तोडफोड करत तिघांना बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात दीपक शेडगे यांच्यासह तिघेजण जखमी झाले असून, शेडगे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दापोली पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. त्यापैकी दोघांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून दोघे अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत दीपक दत्ताराम शेडगे (वय ४०, सध्या रा. विरार वेस्ट, पालघर; मूळ रा. टांगर, दापोली) यांनी दापोली पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार, ते चुलत भाऊ प्रवीण प्रताप जेधे आणि स्वप्नील मारुती शेडगे यांच्यासह कामानिमित्त दापोलीत आले होते. सावंत इमारतीसमोर त्यांनी कार उभी केली असता समोरच विरुद्ध दिशेला एक रिक्षा-टेम्पो उभा असल्याने वाहन बाहेर काढण्यास अडचण निर्माण झाली. यावरून वाहन हटविण्याची विनंती केल्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला.
यानंतर शेडगे आणि त्यांचे सहकारी कारने दापोली-मंडणगड मार्गावर खरेदीसाठी थांबले असता दुचाकीवरून आलेल्या आफ्रिदी अहमद जोगिलकर, अझर अहमद जोगिलकर, अकलाक अल्लाउद्दीन आलम (सर्व रा. खोडा, दापोली) यांच्यासह अन्य चौघांनी पुन्हा वाद घालत आक्रमक पवित्रा घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. वाद विकोपाला गेल्यानंतर संशयितांनी कारवर दगडफेक करून वाहनाची तोडफोड केली. त्यानंतर कारमधील तिघांना बाहेर ओढून बेदम मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात दीपक शेडगे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला आहे.
दरम्यान, ‘दापोलीत आमची दहशत आहे, तुम्हाला इथे कोणी वाचवायला येणार नाही,’ अशी धमकी देत संशयित आफ्रिदी जोगिलकर याने काचेची बाटली डोक्यात फोडल्याचा आरोप जखमी शेडगे यांनी केला आहे. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला तब्बल १२ टाके पडल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता २०२३ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच आफ्रिदी अहमद जोगिलकर आणि अकलाक अल्लाउद्दीन आलम यांना अटक करण्यात आली असून पुढील तपास दापोली पोलिस करत आहेत. या घटनेनंतर दापोली शहरात खळबळ उडाली असून किरकोळ कारणावरून वाढत्या हिंसक प्रवृत्तीबाबत नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

