(देवळे / प्रकाश चाळके)
“श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहिकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे…” या बालपणी ऐकलेल्या आणि शाळेत शिक्षकांनी शिकवलेल्या कवितेच्या ओळी श्रावण आला की आजही आठवतात. हिरवाईने नटलेला निसर्ग, ढगांची सावली आणि कोवळ्या उन्हाच्या सरी यामुळे श्रावणाचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. त्यातच पिसारा फुलवून नाचणारा मोर दिसला की या निसर्गसौंदर्यात आणखी भर पडते.
“नाच रे मोरा, नाच; फुलव पिसारा नाच…” या बालगीताच्या आठवणीही अशा प्रसंगी जाग्या होतात. शाळेच्या गॅदरिंगमध्ये या गाण्यावर छोट्या-छोट्या पावलांनी नाचणारी बालके पाहिल्याच्या आठवणी अनेकांच्या मनात आजही ताज्या आहेत.
असाच मनमोहक नजारा संगमेश्वर तालुक्यातील आंबा घाटाच्या पायथ्याशी असलेल्या मुर्शी गावात पाहायला मिळाला. श्रावणातील सकाळच्या वेळी ढगांच्या सावलीतून डोकावणाऱ्या कोवळ्या सूर्यकिरणांच्या साक्षीने एका मोराने आपला रंगीबेरंगी पिसारा फुलवत मनमुराद नृत्य केले. हा नयनरम्य क्षण मुर्शी गावचे माजी सरपंच आणि प्रसिद्ध छायाचित्रकार मंगेश दळवी यांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात अलगद टिपला.
बागेतील झाडाझुडपांच्या सान्निध्यात कोवळ्या उन्हात पिसारा फुलवून मोराने केलेले मनमोहक नृत्य आणि त्याचा आवाज यामुळे परिसरातील वातावरणही काही क्षणांसाठी अधिकच रम्य झाले. निसर्गाने श्रावणात साकारलेले हे सुंदर दृश्य मंगेश दळवी यांनी आपल्या कॅमेऱ्यात छायाबद्ध केल्याने निसर्गप्रेमींसाठी ही एक सुखद आठवण ठरली आहे.

