(दापोली)
मुर्डी (ता. दापोली) येथील नवखंडा शेतामध्ये गुरे चरवण्यावरून झालेल्या वादातून एकनाथ राऊत (वय ३९) या शेतकऱ्यावर कोयत्याने हल्ला करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी विश्वास महाडिक (रा. आंजर्ले कातळकोंड) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ जुलै २०२५ रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास एकनाथ राऊत हे आपल्या शेतामध्ये गुरे चरवत असताना, त्यांनी हातातील काठीने जनावरे हाकलली. यावरून आरोपी विश्वास महाडिक यांनी गैरसमज करून घेत राऊत यांना शिवीगाळ केली. त्यानंतर कोयत्याने हल्ला करून डाव्या हाताचे मनगट, डोके, हनुवटी आणि दाताला गंभीर इजा केली.
या प्रकरणी दापोली पोलिस ठाण्यात गु.र.नं. १३१/२०२५ अन्वये भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम ११८(१), ३५२, ३५१(२) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून संशयित आरोपीचा शोध घेतला जात आहे. तसेच जखमी राऊत यांच्यावर उपचार सुरू आहेत.