(दापोली)
कृषी जीविका आणि पर्णमही गटाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा, मळे येथे अतिथी व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. सचिन पाठक (विषय तज्ञ,कृषी अभियांत्रिकी विभाग, कृषी महाविद्यालय, दापोली) व डॉ. प्रवीण झगडे (रावे प्रोग्रॅम ऑफिसर) उपस्थित होते. या व्याख्यानांमध्ये शेतीचे यंत्रीकरण आणि विद्यापीठ तंत्रज्ञान प्रसिद्धी व प्रसार याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
पहिले व्याख्यान डॉ. पाठक सरांनी शेतीच्या यांत्रीकरणाविषयी घेतले. त्यांनी सुरुवातीला पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या भात रोपलावणीतील मर्यादा सांगितल्या. या पद्धतीत वेळ आणि मजूर यांची मोठ्या प्रमाणात गरज असते. यावर उपाय म्हणून त्यांनी यांत्रीकरणाचे महत्त्व स्पष्ट केले व ते शेतकऱ्यांसाठी कसे उपयुक्त ठरते याचे स्पष्टीकरण केले. यावेळी त्यांनी विद्यापीठाने विकसित केलेली विविध साधने व त्यांची कार्यपद्धती, किंमत, देखभाल याविषयी स्लाईड शोद्वारे माहिती दिली. तसेच त्यांनी प्रत्यक्ष दाखले व उपकरणे दाखवून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यामध्ये पंकज पडलर, नूतन आंबा हार्वेस्टर, ओला काजू कटर, सुपारी सोलणारी मशीन, अमर लोरँथस कटर आणि वैभव विळा यांचा समावेश होता. यासोबतच त्यांनी यंत्रीकरणासाठी उपलब्ध शासन योजनांची माहिती दिली. तसेच सुपारी वर्गीकरण, त्याची बाजारभावनुसार किंमत व विपणन याबाबतही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. हा सत्र शेतकरी व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरला.
दुसरे व्याख्यान डॉ. प्रवीण झगडे घेतले. त्यांनी विद्यापीठाच्या शिक्षण, संशोधन व विस्तार कार्याची भूमिका समजावून सांगितली. विद्यापीठामध्ये उपलब्ध असलेल्या विविध अभ्यासक्रमांची माहिती दिली. तसेच ग्राम बीज उत्पादन योजना, कंदपिक योजना व पीपीव्हीएफआर योजना अशा शेतकरीाभिमुख योजनांविषयी माहिती दिली. शेतकऱ्यांनी एकत्रित व सहकारी शेती पद्धती अवलंबण्याचे आवाहन केले. त्यांनी ‘अवजार बँक’ या संकल्पनेचीही माहिती दिली. भात, नाचणी, आंबा, काजू इत्यादी पिकांमध्ये विद्यापीठाने विकसित केलेल्या सुधारित जातींबाबतही माहिती पुरवली.
या कार्यक्रमामध्ये महिला शेतकऱ्यांनीही सहभाग घेतला. डॉ.झगडे यांनी फळ प्रक्रिया व मूल्यवर्धनाविषयी विद्यापीठाच्या उपक्रमांबाबत माहिती दिली. तसेच शेतकऱ्यांच्या दैनंदिन शेतीत येणाऱ्या अडचणींवर व्यावहारिक उपाय सुचविले. शेवटी त्यांनी कृषी, बागायती, मत्स्यपालन व वनीकरण विषयक विद्यापीठाने विकसित केलेल्या मोबाईल अनुप्रयोगांची माहिती दिली. दोन्ही व्याख्याने अत्यंत माहितीपूर्ण ठरली व शेतकरी व विद्यार्थी यांनी त्यांचे मनापासून कौतुक केले.

