(जाकादेवी / संतोष पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड भंडारवाडा येथील श्री गोपाळ कृष्ण मंदिरात श्रावणी एक्का उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडला. भजन मंडळांच्या सुमधुर आवाजाने तसेच संगीताच्या तालावर झालेल्या हरिनामाच्या गजराने मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारून गेला होता.
सन १९६६ पासून श्री गोपाळ कृष्ण मंदिरात एक्का उत्सवाची परंपरा अखंडपणे सुरू आहे. या उत्सवाच्या निमित्ताने समाजातील लहान-थोर मंडळी एकत्र येऊन हरिनामाचा गजर करतात. त्यामुळे धार्मिक वातावरणासोबतच सामाजिक बांधिलकी आणि एकोपा जोपासण्यासही हातभार लागतो. धार्मिक व सामाजिक ऐक्य टिकवण्यासाठी हरिनामाचा गजर महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे यावेळी दिसून आले.
उत्सवात लहान बालकांपासून पुरुष आणि महिलांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. पंचक्रोशीतील विविध भजन मंडळांनी सहभाग घेत उत्सवाची रंगत वाढवली. त्यांच्या सुमधुर भजनांनी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले.
या उत्सवात गोपाळ कृष्ण भजन मंडळ केदारवाडी, गणपतीपुळे गोपाळकृष्ण महिला मंडळ, भंडारपुळे भजन मंडळ, मोरया चौक गणपतीपुळे, भुतेवाडी भजन मंडळ, उत्कर्ष महिला मंडळ, रत्नागिरी वीरवाडी महिला मंडळ, भंडारपुळे जांभूळवाडी भजन मंडळ यांसह अनेक भजन मंडळांनी सहभाग घेतला.
उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी गोपाळकृष्ण मंदिर मंडळाचे अध्यक्ष भूषण मयेकर, उपाध्यक्ष किशोर पाटील, खजिनदार शेखर खेऊर, सचिव अजित पाटील यांच्यासह ट्रस्टी, पदाधिकारी, कार्यकर्ते, सदस्य, महिला आणि भाविकांनी विशेष परिश्रम घेतले. उत्सवाला भाविकांची मोठी उपस्थिती लाभली.

