(सिंधुदूर्ग / वैभववाडी)
महाराष्ट्र ब्राह्मण मंडळ, सिंधुदुर्गच्या जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य तथा वैभववाडीतील युवा वकील ॲड. विवेक गोखले (वय ३४) यांचे सोमवारी मध्यरात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने आकस्मिक निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने वैभववाडी तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
ॲड. विवेक गोखले हे गेल्या काही वर्षांपासून वैभववाडी येथे वकिली व्यवसाय करत होते. वकिली क्षेत्रासोबतच ते सामाजिक कार्यातही सक्रिय होते. महाराष्ट्र ब्राह्मण मंडळ, सिंधुदुर्गच्या जिल्हा कार्यकारिणीवर ते सदस्य म्हणून कार्यरत होते. मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी विविध क्षेत्रांतील नागरिकांशी आपुलकीचे संबंध निर्माण केले होते.
वयाच्या अवघ्या ३४व्या वर्षी त्यांचे निधन झाल्याने कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच परिचितांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच वैभववाडी परिसरात शोककळा पसरली आहे.

