(मुंबई)
कोकण रेल्वेवर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले असून, रत्नागिरी रेल्वे स्थानकात लवकरच रेल्वे पोलीस ठाण्याचे उद्घाटन होणार आहे. यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांना कायदेशीर मदत व सुरक्षेची सोय त्वरित उपलब्ध होणार आहे. प्रारंभी या ठाण्यात ३ ते ४ अधिकारी आणि ६० पोलीस कर्मचारी कार्यरत राहतील.
सध्या रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) रेल्वेची मालमत्ता, प्रवाशांचा माल व सुरक्षेची जबाबदारी सांभाळते. तर रेल्वे स्थानकांवरील गुन्ह्यांचा तपास व गुन्हे उकलण्याची जबाबदारी रेल्वे पोलिसांकडे असते. मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत आतापर्यंत सीएसएमटी ते पनवेल, कसारा, खोपोली तसेच चर्चगेट ते डहाणू रोडपर्यंतचा मार्ग येत होता. मात्र, रोहा नंतरचा कोकण रेल्वे मार्ग स्थानिक पोलीस ठाण्यांच्या अखत्यारीत होता. प्रवाशांची वाढती संख्या, मोबाइल चोरी, सोनसाखळी खेचणे, महिलांवरील गुन्हे आणि गंभीर प्रकारांच्या घटना लक्षात घेता या मार्गावर स्वतंत्र रेल्वे पोलीस ठाणे उभारण्याची गरज भासत होती.
राज्य शासनाच्या मान्यतेनंतर रत्नागिरी रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलीस ठाणे कार्यान्वित करण्यात आले आहे. यामुळे प्रवाशांना थेट रेल्वे पोलिसांकडे तक्रार नोंदवता येईल, तसेच तपासात गती येईल.
या ठाण्याच्या हद्दीत रायगड जिल्ह्यातील कोलाड ते विन्हेरे रेल्वे स्थानकांचा भाग, तर रत्नागिरी जिल्ह्यातील दिवाणखवटी ते राजापूर रेल्वे स्थानकांचा भाग समाविष्ट केला आहे. प्रत्येक रेल्वे स्थानकाचा परिसर या हद्दीत येणार असून, स्थानकाच्या दोन्ही बाजूंनी ४०० ते ५०० मीटर क्षेत्र वगळता उर्वरित भाग स्थानिक पोलीस ठाण्याच्या अखत्यारीतच राहणार आहे.

