(राजापूर / वार्ताहर)
राजापूर नगर परिषदेच्या व्यायामशाळेसाठी आवश्यक नवीन साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी निधीचा प्रस्ताव सादर करावा. तसेच नगर परिषदेच्या दीडशेव्या वर्धापन वर्षाचे औचित्य साधून पुढील वर्षी जवाहर चौक येथे ‘नगराध्यक्ष श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात येईल, अशी घोषणा नगराध्यक्षा अॅड. हुस्नबानू खलिफे यांनी केली.
हौशी शरीरसौष्ठव संघटना, राजापूर आणि राजापूर नगर परिषद व्यायामशाळेच्या संयुक्त विद्यमाने जवाहर चौक येथील नगर परिषदेच्या एस.टी. पिकअप शेड सभागृहात रविवारी २५व्या व्यायाम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. दंड, बैठका, बेंचप्रेस आणि स्कॉटिंग या विविध प्रकारांत झालेल्या या स्पर्धेत सुमारे ७० स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
दंड-बैठका प्रकारातील शालेय लहान गटात यज्ञेश पेणकर यांनी प्रथम, युवराज पेणकर यांनी द्वितीय, तर समर्थ झिंबरे यांनी तृतीय क्रमांक मिळवला. मोठ्या गटात सिद्धेश शिंदे प्रथम, स्वप्नील गोठणकर द्वितीय, तर प्रथम घाडी तृतीय ठरले. युवराज सुतार आणि नैतिक चव्हाण यांना विशेष गौरव करण्यात आला.
बैठका प्रकारातील मोठ्या गटात सार्थक पवार यांनी प्रथम, प्रथम घाडी यांनी द्वितीय, तर युवराज सुतार यांनी तृतीय क्रमांक पटकावला. अनुराज चौधरी आणि विराज भोसले यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. बेंचप्रेसमध्ये प्रणय आयरे प्रथम, मुक्तसिद गोवळकर द्वितीय, तर दीपक चव्हाण तृतीय ठरले. दीपक देसाई आणि वैभव बिर्जे यांना उत्तेजनार्थ गौरविण्यात आले.
स्कॉटिंग प्रकारात दीपक देसाई यांनी प्रथम, दुष्यंत पाथरे यांनी द्वितीय, तर ओंकार जड्यार यांनी तृतीय क्रमांक मिळवला. मुक्तसिद गोवळकर आणि चैतन्य बाणे यांना उत्तेजनार्थ गौरविण्यात आले.
यावेळी नगराध्यक्षा अॅड. हुस्नबानू खलिफे, पोलिस निरीक्षक अमित यादव, व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर, नगरसेवक सिद्धांत जाधव, महेश शिवलकर, सुबोध पवार, दिलीप चव्हाण, पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र मोहिते, प्रकाश नाचणेकर, राजू जोगले, डॉ. सुयोग परांजपे आदी मान्यवर उपस्थित होते. हौशी शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष तथा अर्बन बँकेचे संचालक दिनानाथ कोळवणकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून दरवर्षी मेहनतीने ही स्पर्धा आयोजित केली जात असल्याबद्दल मान्यवरांनी कौतुक केले.
स्पर्धेदरम्यान उत्कृष्ट सेवापदक मिळाल्याबद्दल पोलिस निरीक्षक अमित यादव यांचा सत्कार करण्यात आला. यंदाच्या स्पर्धेतील विजेत्यांना कै. भास्कर विठ्ठल शिवलकर यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव आणि पुणे येथील वकील अॅड. गुरुप्रसाद शिवलकर यांनी भव्य चषक पुरस्कृत केला.
स्पर्धेचा शुभारंभ माजी नगराध्यक्ष मधुकर देवरूखकर यांच्या हस्ते झाला. यावेळी नगरसेवक सिद्धांत जाधव, सुबोध पवार आणि राजापूर अर्बन बँकेचे माजी संचालक सुधीर खडपे उपस्थित होते.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष दिनानाथ कोळवणकर, सचिव राजीव राणे यांच्यासह अशोक तांबे, मंदार बावधनकर, मंदार पेणकर, प्रशांत लिंगायत, प्रशांत सातोपे, विघ्नेश अमरे, शुभम पवार, चैतन्य बाणे, आदित्य शिवलकर, ऋतुराज मणचेकर, दिलीप झिंबरे, सागर शिंदे, साईनाथ रेवडेकर, कपिल राणे, अनास काझी, स्वप्नील गोठणकर, सुधीर गवरे, प्रशांत सागवेकर आणि समीर पेडणेकर आदींनी मेहनत घेतली.
स्पर्धेसाठी अल्पोपहाराची व्यवस्था गुंड्या बावधनकर यांनी, तर ध्वनीव्यवस्था रामचंद्र पिठलेकर यांनी सांभाळली. धोपेश्वरचे युवा सरपंच उमेश शिवगण यांचा सहकार्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. हर्षद मांडवकर आणि संदीप चव्हाण यांनी पंच म्हणून जबाबदारी पार पाडली.

