(अमरावती)
राज्यातील महापालिका निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. युती आणि आघाड्यांसाठी बैठकांचा धडाका आणि महापालिका निवडणुकीच्या वाटाघाटी सुरू असतानाच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आनंदराव अडसूळ यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना तत्काळ अमरावतीतील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्ष जोरात तयारीला लागले आहेत. जागावाटप, युती आणि रणनीती यावरून प्रत्येक जिल्ह्यात बैठकांवर बैठका सुरू आहेत. अशा वातावरणात एकनाथ शिंदे गटातील शिवसेनेचे प्रमुख नेते आनंदराव अडसूळ यांची तब्येत बिघडल्याची माहिती समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
अमरावती महानगरपालिकेसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना यांच्यात जागावाटपावर चर्चा सुरू असतानाच ही घटना घडली. अडसूळ यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची भेट घेण्यासाठी भाजपचे आमदार संजय कुटे रुग्णालयात पोहोचले होते.
दरम्यान, याच भेटीदरम्यान आमदार संजय कुटे आणि माजी आमदार अभिजीत अडसूळ यांच्यात पुन्हा एकदा जागावाटपाबाबत चर्चा सुरू झाल्याची माहिती आहे. त्यामुळे दुपारी युती तुटल्याच्या चर्चेनंतर आता पुन्हा भाजप आणि शिवसेनेत बोलणी सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत.
याआधी शिवसेनेने भाजपसमोर काही जागांचा प्रस्ताव ठेवला होता, मात्र तो भाजपकडून अमान्य करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर पुन्हा वाटाघाटी सुरू झाल्याने अमरावती महापालिका निवडणुकीत पुढे नेमके काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

