(संगमेश्वर / वार्ताहर)
संगमेश्वर तालुक्यातील चाफवली गावच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी प्रकाश चाळके यांची सलग आठव्या वर्षी बिनविरोध निवड करण्यात आली. गेल्या सात वर्षांपासून ग्रामस्थांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांची तंटामुक्त अध्यक्षपदी बिनविरोध निवड केली होती. यंदाही ग्रामस्थांनी त्यांच्यावर पुन्हा विश्वास व्यक्त करत आठव्या वर्षी त्यांची बिनविरोध निवड केली.
गावातील बैठकीत उपस्थित ग्रामस्थांनी एकमुखाने प्रकाश चाळके यांच्या नावाला संमती दिली. यावेळी सरपंच आरोही रावण, उपसरपंच विजय घुमे, माजी उपसरपंच सुरेश चाळके, पोलीस पाटील विजय चाळके, ग्रामसेवक प्रवीण माईन, संजय चाळके, विनय चाळके, अनंत दळवी, सदानंद पाटोळे, प्रतीक चाळके, राजाराम लिगम, हरेश केसव, प्रभाकर केसव, राजाराम (बुवा) भालेकर, चंदा कांबळे, राजश्री चाळके यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
कोरोना काळापासून प्रकाश चाळके यांनी गावात तंटामुक्तीच्या माध्यमातून चांगले काम केले असून, विविध प्रश्नांवर समन्वयाने तोडगा काढण्यासाठी त्यांनी प्रयत्न केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यांच्या कामाची दखल घेत ग्रामस्थांनी सलग आठव्या वर्षी त्यांची बिनविरोध निवड केली.
निवडीनंतर सत्काराला उत्तर देताना प्रकाश चाळके म्हणाले की, गेल्या सात वर्षांत चाफवली ग्रामस्थ, तंटामुक्त समितीचे सदस्य, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच आणि उपसरपंच यांनी माझ्यावर विश्वास ठेवून वेळोवेळी सहकार्य केले. त्यामुळेच गावासाठी चांगले काम करणे शक्य झाले. यापुढेही सर्वांच्या सहकार्याने गावातील नागरिकांना योग्य न्याय देण्यासाठी आणि गावातील तंटे सामोपचाराने सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे.

