(दापोली / वार्ताहर)
दापोली सायकलिंग क्लबचे सदस्य शरद भुवड (पंचनदी) यांनी ३ ते २० ऑगस्ट २०२६ या कालावधीत मनाली ते झांस्कर-लेह लडाख ही खडतर सायकल मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली. या मोहिमेत शरद भुवड यांच्यासह आदित्य दास, सुप्रिय फले, अनिल गडगे आणि जनार्दन वैद्यनाथन या पाच सायकलस्वारांचा सहभाग होता. विशेष म्हणजे ही सेल्फ-सपोर्टेड मोहीम होती. म्हणजेच प्रवासासाठी आवश्यक असलेले सामान प्रत्येक सायकलस्वाराने स्वतःच्या सायकलवर घेऊन ही मोहीम पूर्ण केली.
गाडीच्या काचेतून हिमालयाचा निसर्ग पाहणे आणि सायकलच्या हँडलवर घट्ट पकड ठेवत थंड वाऱ्याचे झोत अंगावर झेलत हिमालयातील खडतर चढण पार करणे, या दोन्ही अनुभवांमध्ये मोठा फरक आहे. मनाली, लाहौल आणि झांस्कर खोऱ्यातील दुर्गम आणि आव्हानात्मक रस्ते जगभरातील सायकलस्वारांसाठी साहसाचे मोठे आकर्षण ठरत आहेत.
या मोहिमेबाबत शरद भुवड यांनी सांगितले की, सायकलचे प्रत्येक पेडल मारताना बदलणारे निसर्गाचे रूप आणि त्याचवेळी वाढत जाणारी श्वासांची गती हा अनुभव शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे. मनालीच्या हिरव्यागार दऱ्यांमधून सुरू झालेल्या या प्रवासात कोठी, मढी, रोहतांग पास, कोकसर, त्रिलोकीनाथ, कीलाँग, शिंकुला पास, झांस्कर सुम्दो, गोम्बो रांझन, पुराने, फुगताल, पदुम, कर्शा मॉनेस्ट्री, लेह-लडाख, खार्दुंगला आदी दुर्गम भागांचा समावेश होता. या मोहिमेदरम्यान ६०० किलोमीटरहून अधिक अंतर सायकलवरून पार करण्यात आले.
या संपूर्ण मोहिमेतील सर्वात आव्हानात्मक टप्प्यांपैकी एक म्हणजे लेहहून सुरू झालेली खार्दुंगला टॉपची चढण. सुमारे १७,९८२ फूट उंचीवरील खार्दुंगला मार्गावर ८४ किलोमीटरचा खडतर प्रवास करताना सायकलस्वारांच्या जिद्दीची आणि शारीरिक क्षमतेची कसोटी लागली. प्रत्येक पेडलसोबत वाढणारी उंची, विरळ हवा आणि बदलते हवामान यामुळे हा टप्पा अत्यंत आव्हानात्मक ठरला. खार्दुंगला टॉपवर सायकलसह पोहोचण्याचा क्षण आयुष्यातील अविस्मरणीय आणि सुवर्णक्षण असल्याचे भुवड यांनी सांगितले.
सायकलवरून हिमालयातील हा प्रवास निश्चितच सोपा नव्हता. लांब चढणी, थकवा, विरळ हवा आणि सतत बदलणारे हवामान अशा अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. मात्र वाहनाच्या इंजिनाची मदत न घेता केवळ स्वतःच्या ताकदीवर हिमालयातील कठीण मार्ग पार करण्याचा अनुभव या सायकलस्वारांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरला.
ही साहसी सायकल मोहीम यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल दापोली सायकलिंग क्लबचे शरद भुवड आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

