(संगमेश्वर/ प्रतिनिधी)
इन्स्टाग्रामवर आलेली अनोळखी APK फाईल डाउनलोड करणे एका २१ वर्षीय तरुणाला चांगलेच महागात पडले. फाईल डाउनलोड केल्यानंतर मोबाईल वारंवार बंद पडत असतानाच त्याच्या बँक खात्यातून तब्बल ५५ हजार ५९९ रुपये ऑनलाइन पद्धतीने परस्पर वळते करण्यात आले. या प्रकरणी देवरूख पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार कौस्तुभ संतोष सोमण (वय २१, रा. साडवली, साईनगर, ता. संगमेश्वर) हे ७ सप्टेंबर रोजी महाविद्यालयात असताना लिंक्डइनचे सत्र सुरू होते. त्यावेळी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवरील इन्स्टाग्राम अँपवरून एका APK फाईलची लिंक/फाईल प्राप्त झाली. या फाईलचे संपूर्ण नाव स्पष्टपणे सांगता येत नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. कौस्तुभ यांनी ती फाईल डाउनलोड केली. त्यानंतर त्यांचा मोबाईल त्याच दिवशी तब्बल चार ते पाच वेळा अचानक बंद पडला. ८ सप्टेंबर रोजी दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारासही मोबाईल पुन्हा बंद पडला. त्यांनी तो स्विच ऑन करून सुरू केला. मात्र, या तांत्रिक बिघाडामागे गंभीर सायबर फसवणुकीचा प्रकार दडलेला असल्याचे त्यावेळी त्यांच्या लक्षात आले नाही.
९ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास कौस्तुभ हे गुगल पेच्या माध्यमातून बँक ऑफ महाराष्ट्र, देवरूख शाखेतील आपल्या खात्याची शिल्लक तपासत असताना त्यांना धक्कादायक प्रकार निदर्शनास आला. त्यांच्या खात्यातून ८ सप्टेंबर रोजी दुपारी १२.५२ वाजता ५५,५९९ रुपये यूपीआय व्यवहाराद्वारे ‘kumarrakesh2997@bpunity’ या यूपीआय आयडीवर वळते करण्यात आले होते. अनोळखी APK फाईल डाउनलोड केल्यानंतर मोबाईलमध्ये वारंवार निर्माण झालेला तांत्रिक बिघाड आणि त्यानंतर खात्यातून झालेला संशयास्पद व्यवहार यामुळे कौस्तुभ यांनी देवरूख पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता २०२३ मधील कलम ३१८(४) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० मधील कलम ६६(ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘APK’ फाईलच्या माध्यमातून मोबाईलमध्ये घुसखोरी करून ही रक्कम परस्पर वळती करण्यात आली का, याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे. संबंधित यूपीआय आयडीधारकाचे पूर्ण नाव व पत्ता अद्याप समोर आलेला नसून, देवरूख पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.


