(संगमेश्वर / एजाज पटेल)
बुरंबी पंचक्रोशीतील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते व प्रतिष्ठित उद्योगपती सुनील गेल्ये यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत उबाठा शिवसेना पक्षाच्या वतीने संगमेश्वर येथील स्वाद हॉटेल मध्ये नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमात त्यांचा सन्मान करण्यात आला. जिल्हा संपर्क प्रमुख सहदेव बेटकर यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन हा सत्कार करण्यात आला.
सुनील गेल्ये हे गेल्या अनेक वर्षांपासून बुरंबी पंचक्रोशी परिसरात सामाजिक, शैक्षणिक व सार्वजनिक हिताच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत आहेत. गरजू नागरिकांना मदत, युवकांना प्रोत्साहन, तसेच परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी सातत्याने योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत उबाठा शिवसेनेने त्यांचा गौरव करून सामाजिक कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमास व्यासपीठावर माजी राज्य मंत्री रवींद्र माने, जिल्हा प्रमुख दत्ता कदम, जिल्हा समन्वयक रवींद्र डोळस, जिल्हा संघटक संतोष थेराडे, उपतालुका प्रमुख प्रकाश घाणेकर, माजी सभापती दिलीप पेंढारी यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी सुनील गेल्ये यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. समाजातील सकारात्मक बदलासाठी अशा कार्यकर्त्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
सत्काराला उत्तर देताना सुनील गेल्ये यांनी मिळालेला सन्मान हा समाजातील सर्व सहकार्य करणाऱ्या बांधवांचा असल्याचे सांगत, भविष्यातही सामाजिक कार्य अधिक जोमाने सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

