(संगमेश्वर / प्रतिनिधी)
ग्रामीण भागातील रुग्णांना अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देणाऱ्या भ. क. ल. वालावलकर रुग्णालयात १५ ते १८ जुलै २०२६ या कालावधीत विविध आजारांवरील भव्य महाशस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात विशेषतः मधुमेहामुळे होणाऱ्या पायांवरील जखमा (डायबेटीस फूट) तसेच गुदद्वाराशी संबंधित आजारांवर (लेसर प्रोक्टोलॉजी) तज्ज्ञ डॉक्टरांकडून आधुनिक उपचार करण्यात येणार असून, काही उपचार मोफत तर काही अल्पदरात उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
मधुमेहामुळे अनेक रुग्णांच्या पायांवर गंभीर जखमा होणे, सूज येणे, संसर्ग होणे, मुंग्या येणे किंवा पाय बधिर पडणे अशा समस्या निर्माण होतात. वेळेत उपचार न मिळाल्यास पाय कापण्याची वेळही येऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन रुग्णालयाने हे विशेष शिबीर आयोजित केले आहे.
ज्या रुग्णांच्या पायावर दीर्घकाळ बरी न होणारी जखम आहे, पायाला मुंग्या येतात, जळजळ किंवा बधिरपणा जाणवतो, सूज किंवा पू होतो अथवा वारंवार संसर्गाचा त्रास होतो, अशा रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन रुग्णालय प्रशासनाने केले आहे.
याशिवाय १७ व १८ जुलै रोजी लेसर प्रोक्टोलॉजी उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात गुदद्वाराशी संबंधित विविध आजारांवर अत्याधुनिक लेसर तंत्रज्ञानाद्वारे तपासणी व उपचार केले जाणार आहेत.
या शिबिरात मूळव्याध (गुदद्वारातील सूज, रक्तस्राव व वेदना), फिस्टुला (गुदद्वाराजवळील नळी, पू येणे व वारंवार संसर्ग) तसेच फिशर (शौचाच्या वेळी तीव्र वेदना व रक्तस्राव) या आजारांवरील तपासणी आणि आधुनिक लेसर शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे.
शिबिरातील सुविधा
या महाशस्त्रक्रिया शिबिरात रुग्णांना पुढील सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
- तज्ज्ञ डॉक्टरांकडून सखोल व अत्याधुनिक तपासणी
- मधुमेही पायांच्या जखमांवर विशेष उपचार व ड्रेसिंग
- आवश्यक औषधोपचार
- तज्ज्ञांचा वैद्यकीय सल्ला
- पायांची योग्य काळजी घेण्यासाठी सविस्तर मार्गदर्शन
डायबेटीस फूटवरील उपचार अल्पदरात उपलब्ध करून दिले जाणार असून, कोकणातील गरजू रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन भ. क. ल. वालावलकर रुग्णालय प्रशासनाने केले आहे.

