(संगमेश्वर / एजाज पटेल )
संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील गजबजलेल्या आणि कायम रहदारी असलेल्या परिसरात अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करत ‘रफिक मार्ट’ या किराणा दुकानातून तब्बल ६० हजार ३४० रुपयांचा किराणा माल लंपास केला. भरवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे व्यापारी आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, चोरट्यांनी पोलिसांसमोरच खुले आव्हान उभे केल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कसबा उभा मोहल्ला येथील रहिवासी मुमताज रफिक मेमन यांचे मुख्य रस्त्यालगत ‘रफिक मार्ट’ नावाचे किराणा दुकान आहे. २५ जुलै रोजी रात्री सुमारे १० वाजता त्यांनी नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी प्रस्थान केले. त्यानंतर २५ जुलै रात्री १० ते २६ जुलै रोजी सकाळी ८.३० या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी दुकानात बेकायदेशीर प्रवेश करून मोठ्या प्रमाणात किराणा मालाची चोरी केली.
चोरट्यांनी रोकड न चोरता थेट महागड्या किराणा साहित्यालाच लक्ष्य केले. यात ५० किलोच्या दोन साखरेच्या गोण्या (₹४ हजार), ३५ किलोच्या दोन मिरचीच्या गोण्या (₹१६ हजार), ३० किलोची जिऱ्याची बॅग (₹६ हजार), जेमिनी सनफ्लॉवर तेलाचे पाच बॉक्स (६० पॅकेट्स) किंमत ₹१०,२००, राजा सोया तेलाच्या १३ किलोच्या चार बरण्या (₹८,८००), जेमिनी सनफ्लॉवर तेलाच्या १३ किलोच्या तीन बरण्या (₹७,७४०) तसेच इतर किराणा साहित्य (₹७,६००) असा एकूण ₹६०,३४० किमतीचा माल लंपास करण्यात आला.
इतक्या मोठ्या प्रमाणात वजनदार गोण्या, तेलाचे बॉक्स आणि बरण्या चोरून नेण्यासाठी चोरट्यांनी एखाद्या वाहनाचा वापर केला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास मुमताज मेमन दुकान उघडण्यासाठी आल्या असता, दुकानातील सामान अस्ताव्यस्त पडलेले आणि मोठ्या प्रमाणात माल चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी तातडीने संगमेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
या प्रकरणी संगमेश्वर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, घटनास्थळाचा पंचनामा करून तपास सुरू केला आहे. भरवस्तीत घडलेल्या या धाडसी चोरीमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपींचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

